मुंबई : 'इश्क मे जीना इश्क मे मरना....', असं म्हणत प्रेम केलंय गुन्हा नाही, हे ताठ मानेनं सांगणारी अनारकली कोणीही विसरु शकलेलं नाही. डोक्यावर असणारी ओढणी मागे सरकल्यानंतर समोर येणारं आरस्पानी सौंदर्य डोळे दीपवणारं. हे सौंदर्य होतं, अभिनेत्री मधुबाला यांचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुबाला यांच्या सौंदर्याच्या बाबतीत लिहिण्यात आलेला कोणताही शब्द कधीच अतिशयोक्ती ठरला नाही. यामागचं कारण त्यांचं रुप पाहूनच लक्षात येतं. 


मधुबाला म्हणजे देवानं वेळ काढून साकारलेलं व्यक्तीरुप, असंच अनेकांचं म्हणणं. अतिशय कमी वयातच ही अभिनेत्री जगाचा निरोप घेऊन निघून गेली. 


पण, तिच्या अभिजात सौंदर्यानं मात्र अशी काही छाप सोडली, जी आजच्या पिढीलाही भुरळ पाडणारी ठरत आहे. 


अशा या अभिनेत्रीचा वाढदिवसही 14 फेब्रुवारी, म्हणजेच व्हॅलंटाईन्स डे ला. जिच्याकड़े पाहून प्रेम म्हणजे काय, याची परिभाषा अनेकांना कळली अशा या अभिनेत्रीला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. 


शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीचाही समावेश आहे. इम्तियाजचं मधुबालाप्रती असणारं वेड त्यानं लिहिलेलं कॅप्शन पाहून लक्षात येत आहे. 


'मधुबाला यांच्यासोबत आपला फोटो पाहून खरंच भानावर येणं कठीण होतंय. मी त्यांच्या जुन्या बंगल्यामध्येही चित्रीकरण केलंय... त्यांचं भूत, आत्मा तरी दिसावी अशीच आशा होती... वाढदिवसाच्या शुभेच्छा...चिरतरुण मधुबाला...', असं त्याने एका फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 



इम्तियाजला मधुबाला यांचं भूत किंवा त्यांचा आत्मा काही दिसला नाही, पण यावरून त्याचं त्यांच्यावर असणारं प्रेम मात्र व्यक्त झालं हे खरं.