मुंबई : 'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान', न्यूयॉर्क यासारखे हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक कबीर खान (Kabir khan) वादात अडकला आहे. एका एन्टरटेनमेंट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत 'मुघल हे भारताचे खरे राष्ट्रनिर्माते होते' असा जावईशोध खाननं लावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोपं आहे. साचेबद्ध मांडणीमध्ये त्यांना अडकवणं मला फार त्रासदायक वाटतं. दुर्देवानं मला असं कथानक असणाऱ्या चित्रपटांबद्दल फारसा आदर वाटत नाही. त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असं तुम्ही म्हणत असाल, तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे दाखवलं पाहिजे. लोकप्रिय कथानकासाठी हे सारं केलं जात असल्याचं पाहून मी अस्वस्थ होतो'', असं कबीर खान म्हणाला आहे.



कबीर खान याच्या या विधानामुळे सोशल मीडियात वादळ उठलं आहे. त्याच्या या विधानावरून मतंमतांतरे पुढं येत असली तरी ते वस्तुस्थितीला धरून नसल्याचं मत इतिहासकार व्यक्त करत आहेत.


आपलं स्थापत्य शास्त्र, किल्ले आणि महालांची उभारणी, रस्ते आणि बांध बांधणं, मुघलांची शान-ओ-शौकत यासाठी हे शासक नावाजले गेले हे खरं. पण, त्याच वेळी बिगर मुस्लिमांवर अत्याचार करणारे, मंदिरं पाडणारे, बळजबरीनं धर्मांतर करणारे आणि अय्याश अशीही मुघल शासकांची ओळख आहे.


एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल, तर चर्चेत येण्यासाठी वादग्रस्त विधानं करण्याची बॉलिवूडची ट्रिक जुनीच आहे. कबीर खान यांनीही आपल्या '83' या सिनेमासाठी हीच आयडिया वापरलेली असू शकते. मात्र त्यासाठी मुघल शासकांच्या अत्याचारांना बळी पडलेले लोक आणि मुघलांच्या तावडीतून आपापली संस्थानं मुक्त करताना हौतात्म्य पत्करणाऱ्यांचा अपमान करण्याची गरज नव्हती असाच अनेकांचा सूर आहे.