मुंबई : ऍसिड हल्ला पीडितेच्या वेदनांवर चित्रपटरुपी फुंकर मारत तिचा संघर्ष समाजापर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची जबाबदारी, मेघना गुलजार यांनी घेतली. Chhapaak या आगामी चित्रपटातून त्यांनी एका अत्यंत बोलक्या कथानकाला हाताळलं. ज्यासाठी त्यांनी मध्यवर्ती भूमिकेकरता अभिनेत्री Deepika Padukone दीपिका पदुकोणची निवड केली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला, ज्यानंतर अनेकांनीच दीपिकाच्या अभिनयाची आणि चित्रपटासाठी तिने घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया, कलावर्तुळ अशा सर्वच स्तरांतून दीपिकाची प्रशंसा करण्यात आली. ज्यानंतर आता 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत मेघना गुलजार यांनी चित्रपटासाठी दीपिकाची निवड का केली, यावरुन पडदा उचलला आहे. दीपिकाने या चित्रपटात तिच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी योग्य पद्धतीने निभावल्याचं सांगत यावेळी तिला कोणत्याही वेशभूषा, केशभूषा किंवा  दागदागिन्यांची मदत घ्यावी लागली नाही. तिच्या अभिनयावरच अनेक गोष्टी आधारित होत्या असं मेघना गुलजार यांनी स्पष्ट केलं. 


'मला या चित्रपटात सौंदर्याच्या व्याख्येशी संबंधित चेहऱ्याची निवड करणं महत्त्वाचं होतं. ज्यावेळी तुम्ही तो चेहरा बिघडवता, ज्याप्रमाणे पीडितेने त्या साऱ्याचा सामना केला होता, तेव्हा होणारे परिणाम हे दीर्घकाळासाठी परिणाम करणारे ठरतात',   असं मेघना म्हणाल्या. 


Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच


प्रत्येक मुलगी ही सुंदरच असते.... 


प्रत्येक मुलगी ही दीपिका नसते. पण, त्या सर्वच मुलीसुद्धा सुंदर होत्या. त्यांच्यासोबत हे असं (ऍसिड हल्ले) होणं हे अजिबातच योग्य नव्हतं. किंबहुना कोणत्याच मुलीसोबत असं होऊ नये. मी स्वत:ला नशीबवान समजते की दीपिका या भूमिकेसाठी तयार झाली', असं त्या म्हणाल्या. 



चित्रपटाच्या सुरुवातीला लक्ष्मी अग्रवालचे ऍसिड हल्ल्यापूर्वीचे फोटो पाहिले असता हे तिचा चेहरा दीपिकाशी बराच मिळताजुळता असल्याचं लक्षात आलं. तेव्हाच गोष्टी लक्षात येऊ लागल्याचं मेघना गुलजार यांनी सांगितलं. दीपिका 'मालती' साकारत असताना तिला कधीच लक्ष्मीप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही. पण, देव न करो आणि खऱ्या आयुष्यात असा कोणता अपघात तिच्याशी झाल्यास ती कशी दिसेल हे लक्षात ठेवत सारंकाही साकारण्यात आलं होतं. मुळात दीपिकाचं स्वत:चं अस्तित्वंही त्या भूमिकेत आहे, असं म्हणत मेघना यांनी तिच्या डोळ्यांचा उल्लेख केला. एक दिग्दर्शिका म्हणून त्यांची ही दृष्टी अनेकांना हेवा वाटावी अशीच आहे.