मुंबई : एखादी कलाकृती ज्यावेळी साकारण्यात येते किंवा अंतिम स्वरुपी सर्वांच्या भेटीला येते तेव्हा त्या मुळ कलाकृतीवर अमुक एका कलाकाराचा स्वामित्व हक्क असतो. त्या कलाकाराशिवाय इतर कोणीही त्यासाठीचं श्रेय घेऊ शकत नाही. पण, बऱ्याचदा या साऱ्या अटींचं उल्लंघन केलं जातं. असाच प्रकार सध्या हिंदी कलाविश्वात घडला आहे. जी बाब दिग्दर्शक मोहित सूरी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आणली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आशिकी २' या चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सुरी याने ट्विट करत टी-पेन 'T-Pain' या रॅपरने आपल्या एका चित्रपटातील गाण्याची धुन त्याच्या नव्या गाण्यासाठी वापरल्याची बाब त्याने अधोरेखित केली. 'दॅट्स यो मनी' असे शब्द असणाऱ्या टी पेनच्या नव्या गाण्यासाठी 'आशिकी २' या चित्रपटातील 'क्यूँ की तुम ही हो....', या गाण्याची चाल वापरल्याचं लक्षात येताच त्याने ट्विट करत यामध्ये अतिशय सौम्य शब्दांत ही चूक समोर आणली.




सोशल मीडियावर काही चाहत्यांमुळेच ही बाब समोर आली ज्यानंतर स्वाभाविकच त्याची बरीच चर्चाही झाली. हिंदी चित्रपटांमध्ये अनेकदा परदेशी गाण्यांची धून वापरण्यात आल्याची बाब नाकारता येणार नाही. पण, एखाद्या हिंदी गाण्याची धून वापरल्यामुळे काही नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर, काहींनी टी पेनने या गाण्यापासून प्रेरणा घेत आपण नवी चाल तयार केली आहे, असं स्पष्ट करावं ही इच्छा व्यक्त केली आहे. आता टी पेन यावर काय प्रतिक्रिया देणार याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.