`ही गायिका लोकांना का छळत आहे?`
हिला नको गाऊ द्या...
मुंबई : 'हिला नको गाऊ द्या...', असं म्हणच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्याच आवाजातील आणखी एक गाणं सर्वांच्या भेटीला आणलं.
सोशल मीडियावर हे गाणं प्रचंड व्हायरल झालं आणि त्याच्यावर अनेकांनी टीकाही केली. ज्यामध्ये एक प्रसिद्ध नावही जोडलं गेलं. ही गायिका लोकांना का छळत आहे, असा प्रश्न उपस्थित करणारं हे नाव म्हणजे दिग्दर्शक- निर्माते महेश टिळेकर यांचं.
टिळेकरांनी एक मोठी फेसबुक पोस्ट लिहित अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला आणि टी सीरिजलाही धारेवर धरलं आहे. अनेक चांगल्या आवाजाच्या गायकांना पुढं येण्यासाठी संधी मिळत नाहीत. त्यामुळं जर फडणवीसांकडे अतिरिक्त पैसा असेल तर, त्यांनी नवोदीत गायकांना चांगल्या संगीत शिक्षणाची संधी द्यावी ही बाबही त्यांनी मांडली. असं करत असताना अमृता यांनी स्वत: मात्र गाऊ नये अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.
'सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते ,लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्र्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? गायी म्हशीच्या हंबरडण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण या गायिकेचा आवाज ऐकून तिच्या आवाजाला अनेकांनी शब्दरुपी श्रद्धांजली वाहिली तरीही ही स्वयंघोषित गायिका मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन म्हणत आपल्या गळ्याचा व्यायाम थांबवायचे नाव घेत नाही', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.
'काहीही म्हणा लता मंगेशकर यांनी गायलेल्या " आज अमृताचा दीनु..या ओळीतील अमृता हा शब्द लता दीदींच्या मुखातून ऐकायला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवितून वाचायलाच योग्य वाटतो', असं म्हणत टिळेकर यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली.