मुंबई : जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी देण्यात येणारा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार लेखक प्रकाश मगदुम यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामाकरिता फिल्म सोसायटी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना ‘सत्यजित रे’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  


'शोले', 'शान', 'सीता और गीता', 'सागर'सारख्या अतिशय लोकप्रिय  चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी रसिकांना आजवर  अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी इतिहास रचला असून भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. 


२० व्या 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा' ची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू झाली असून www.thirdeyeasianfilmfestival.com या वेबसाइटवर  ऑनलाईन नोंदणी करता येईल. 


भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी भाषांमधील बारा चित्रपटांचा समावेश आहे. यात फॅमिली, डीप फ्रीझ, बिजया पोरे, या गोष्टीला नावच नाही, आत्मपॅम्पलेट, हाऊस ऑफ कार्डस, एपिसोड १३, सेयुज सनधन, आरोह एक प्रितिभी, मिनी, विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर, गोराई पाखरी या १२ चित्रपटांचा समावेश आहे.


सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा सिंहावलोकन विभाग असणार आहे. कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २० व्या आवृत्तीत, आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील बारा चित्रपटांचा समावेश आहे आणि इराणमधील सात चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.