ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रभा अत्रे यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने 'पद्मश्री', 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमावेळी प्रभा अत्रे यांनी एका अपघातामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळले, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास उलगडला.


संगीत कारकिर्दीला 'अशी' झालेली सुरुवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी त्यांनी त्यांच्या अनेक गोड आठवणींना उजाळा दिला. त्याबरोबरच त्यांनी संगीत क्षेत्रातील प्रवास उलगडला. यावेळी त्या म्हणालेल्या, "माझ्या आयुष्यातील एका अपघातामुळे मी संगीत क्षेत्राकडे वळले. माझी आई कायम आजारी असायची. आईचा विरंगुळा व्हावा म्हणून घरी पेटी शिकवायला शिक्षक यायचे. त्यावेळी आईने पेटी शिकण्याला नकार दिला. पण माझ्या वडिलांनी मला पेटी शिकण्यासाठी हट्ट केला. यानंतर मला संगीत क्षेत्रात आवड निर्माण झाली."


"यानंतर मी अनेक स्पर्धेत भाग घेऊ लागले. त्यात मला एक वेगळी ओळख मिळाली. लोकांना आवडत होतं. त्यानंतर मग माझा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. मी व्यवसायाने गायिका असले, तरी विज्ञान आणि कायदा क्षेत्रातून मी पदवी घेतली आहे. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीकडे त्याच दृष्टीकोनातून पाहायची सवय झाली. त्यामुळे माझे आई, वडील आणि गुरु यांनी मला उघड्या डोळ्याने परंपरेकडे बघ आणि काम कर, असा सल्ला दिला. माझी परंपरेवर खूप श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. संगीत मुळात एक कला आहे, पण त्याला विज्ञानाची जोड आवश्यक आहे", असे त्या म्हणाल्या होत्या. 


"हे टॅलेंट शेवटपर्यंत टिकलं पाहिजे"


"सध्या रियालिटी शोमध्ये प्रचंड प्रमाणात हुशार मुलं येतात. त्यांचा आत्मविश्वास, सादर करण्याची पद्धत कौतुकास्पद असते. मात्र त्यांची कला किती दिवस टिकते यावर मला शंका आहे. कारण कला किंवा संगीत हे सातत्याने समोर येतं. उलगडत जातं. मात्र हे टॅलेंट शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करता येईल, याचा विचार करायला हवा", असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. 


दरम्यान प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या आठव्या वर्षीपासून त्या गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही मिळवली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता