मेघा कुचिक, मुंबई : मुंबईत एका ड्रग्ज माफियाला NCBनं बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहिम मुजावर असं त्याचं नाव आहे. तो स्वत:ला दाऊद इब्राहिमचा फॅन असल्याचं सांगतो. त्याचं दाऊदपेक्षा मोठा डॉन बनायचं स्वप्न होतं. पण एनसीबीनं त्याला वेळीच बेड्या ठोकल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इब्राहिम मुजावर हा दाऊद इब्राहिमला त्याचा आदर्श मानायचा. दाऊदपेक्षा मोठा भाई बनायचं, याचं त्याला वेड होतं. त्यामुळेच दाऊदच्या वडिलांचं इब्राहिम हे नाव घेऊन तो अंडरवर्ल्डमध्ये आला. ड्रग्जची तस्करी करता करता उच्चभ्रूंमध्ये ओळखी त्याने वाढवल्या.


अंडरवर्ल्ड डॉन दाऊदपेक्षाही मोठं होण्याची इब्राहिमची महत्वाकांक्षा होती. यासाठीच तो उच्चभ्रू वस्तीत हाय प्रोफाइल ग्राहकांना टार्गेट करत असे. स्वतःचं स्टेटस जपण्यासाठी तो ड्रग्ज पुरवण्यासाठी मर्सिडीज कार वापरत असे. हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये आपली ऊठबस वाढेल आणि बॉलीवूडमध्येही आपला दबदबा निर्माण करण्याचं त्याचं स्वप्न होत.


लोखंडवाला परिसरात 10 लाख रुपये किंमतीच्या 100 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रगसह NCBनं त्याला रंगेहाथ अटक केली आहे. इब्राहिम आलिशान मर्सिडीज कारमधून मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना ड्रग्जचा पुरवठा करत असे. 


पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी तो जामिनावर बाहेर होता. मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या. इब्राहिम हा एका मोठ्या ड्रग मॉड्यूलचा भाग असल्याचं NCB अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याच्या अटकेमुळे एक मोठं रॅकेट उद्धवस्त होण्याची शक्यता बळावली आहे.