Gauri Khan : देशात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केली आहे. अनेक बड्या नेत्यांवर, उद्योगपतींवरही ईडीने कारवाई केली आहे. त्यामध्ये बॉलिवुडमधील कलाकारांचा देखील समावेश आहे. अशातच आता बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडी नोटीस पाठवण्याची शक्यता आहे. एका रिअल इस्टेट कंपनीच्या घोटाळ्यासंदर्भात गौरी खानवर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. ईडी गौरी खानला नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यासंदर्भातही ही कारवाई होण्याची शक्यता आहे. गौरी खान ही तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तुलसियानी ग्रुपवर 30 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात गौरी खानलाही आरोपी बनवण्यात आलंय. तुलसियानी ग्रुपने गौरी खानला किती मानधन दिलं होतं आणि त्यांच्यामध्ये कोणता करार झाला होता याची माहिती आता ईडी घेणार आहे..


तुलसियानी ग्रुपने गौरी खानला कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरीलाही आरोपी करण्यात आले होते. गौरी खानला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी तुलसियानी ग्रुपने किती पैसे दिले आणि त्यासाठी काही करार करण्यात आला होता का, हे शोधण्याचा ईडीचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच गौरी खानला ईडीकडून नोटीस पाठवली जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, याआधी गेल्या वर्षी मुंबईचे रहिवासी किरीट जसवंत शाह यांनी तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरोधात दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गौरी खानने कंपनीच्या प्रमोशनमुळे 2015 साली तुलसियानी ग्रुपकडून सुमारे 85 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. नंतर कंपनीने त्यांना ताबा दिला नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत, असा दावा किरीट शाह यांनी केला होता.


नेमकं प्रकरण काय?


लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी भागातील तुलसियानी गोल्फ व्ह्यूमध्ये असलेल्या फ्लॅटची किंमत आपण भरल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. हा फ्लॅट त्यांनी दुसऱ्याला दिला होता. या प्रकरणी गौरीशिवाय जसवंत शाह यांनी तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे ​​मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान यांच्या प्रभावाखाली राहून त्यांनी फ्लॅट खरेदी केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.


कंपनीच्या खात्यात 85.46 लाख रुपये जमा केल्याचे जसवंत शहा यांनी तक्रारीत म्हटले होते. पैसे देऊनही त्यांना ताबा देण्यात आला नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी बुक केलेला फ्लॅट दुसऱ्याला विकल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर त्यांनी गौरी खानसह तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.