मुंबई : लोकसभा निवडणुकांचे वारे साऱ्या देशात वाहत असतानाच आता काही बॉलिवूड कलाकारांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यालाही चालना मिळाली आहे. जे नागरिक भारताचे नागरिक नाहीत अशा कलाकारांवर काही स्तरांतून निशाणाही साधण्य़ात आला. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचाही समावेश आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणाऱ्या खिलाडी कुमारच्या कॅनडियन नागरिकत्वाच्या मुद्द्यावरही कलाविश्वातूनच प्रश्न उपस्थित करण्यात आला. ज्यानंतर दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी खिलाडी कुमारची बाजू घेत या प्रश्नाचं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांविषयीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच चित्रपट संकलक आणि लेखक अपूर्व असरानी यांनी अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करत एक प्रकारे त्य़ावर आक्षेपच घेतला. 
'कॅनेडियन नागरिक भारतातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी पात्र असतात का?', असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी २०१६ मधील राष्ट्रीय पुरस्कारांचा संदर्भ दिला. ज्यावेळी अक्षयला 'रुस्तम' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी 'अलिगढ' या चित्रपटासाठी अभिनेता मनोज बाजपेयी यांना पुरस्कार मिळणं अपेक्षित असल्याचा मुद्दा मांडला होता. 



असरानी यांच्या या ट्विटच्या उत्तरार्थ राहुल ढोलकिया यांनी सोशल मीडियाच्याच माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली. परदेशी नागरिकही भारताच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारास पात्र असतात याविषयीची नियमावली पोस्ट केली. ढोलकिया हे राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींच्या समितीचे सदस्यही होते. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. 



नागरिकत्वाच्या मुद्द्यावर काय म्हणतो अक्षय ? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतल्यानंतर अक्षय कुमारवर काही स्तरांतून टीकेची झोड उठवण्यात आली होती. भारताचा नागरिक नसतानाही देशभक्तीच्या मुद्द्यावर भाष्य करण्याची त्याची भूमिका काहींना खटकली होती. त्याचविषयी अक्षयने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं होतं. 



'माझ्या नागरिकत्वाच्या विषयात उगाचच इतका रस का घेतला जातोय आणि त्याविषयी नकारात्मकता का पसरवली जातेय हेच मला कळत नाही आहे. मी कधीही माझं कॅनेडिय़न नागरिकत्व लपवलं नव्हतं. मागील सात वर्षांमध्ये मी कॅनडाला गेलोही नाही हेसुद्धा तितकच खरं आहे. मी भारतात राहतो आणि इथे माझा आयकरही भरतो. या साऱ्या वर्षांमध्ये कधीच कोणापुढेही माझं देशप्रेम वेगळ्या मार्गाने सिद्ध करण्याची गरज भासली नाही', असं त्याने लिहिलं. पण, वारंवार याच मुद्द्यावर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांनी आपल्याला अस्वस्थ केल्याची भावनाही त्याने थेट शब्दांत व्यक्त केली.