सुशांतसिंग प्रकरणी ईडीची कारवाई सुरू, रिया आणि या व्यक्तीच्या कंपन्यांची चौकशी होणार
सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे.
मुंबई : सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे. ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकच्या कंपन्यांची ईडी चौकशी करणार आहे. या दरम्यान रियाची या कंपन्यांमध्ये काय भूमिका होती हे सत्य उघडकीस येणार आहे. शिवाय रिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतच्या बँक खात्यात जानेवारी २०१९ मध्ये सुमारे १६ कोटी रुपये जमा होते आणि डिसेंबर २०१९ पर्यंत त्याने आणखी चार कोटी रुपये जमा केले. आता या खात्यात केवळ पाच कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणूनच सुशांतसिंह याचे कुटुंबीय १५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप करीत आहेत.
शिवाय रियाकडे कोणत्याही प्रकारचा मोठा प्रोजेक्ट नसताना देखील ती तिचा खर्च कशाप्रकारे करत होती. या दरम्यान तिचं उत्पन्नाचं माध्यम कोणतं होतं अशा इत्यादी गोष्टीची चौकशी आता ईडी करणार आहे.
दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत आहे.