रजनीकांत यांची क्रेझ; कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सुट्टी आणि फ्री तिकिट्स
चित्रपट पाहण्यासाठी कंपनीकडून पेड लीव्ह आणि `दरबार` चित्रपटाची फ्री तिकिट्स...
नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट 'दरबार' लवकरच प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटासाठीही चाहते खास तयारी करत आहेत. रजनीकांत यांच्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या चित्रपटासाठी साऊथमधील एका कंपनीने तर, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेड लीव्ह आणि 'दरबार' चित्रपटाची फ्री तिकिट्स ऑफर केली आहेत.
कर्मचाऱ्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट एन्जॉय करावा, यासाठी कंपनीकडून अशाप्रकारे भरपगारी सुट्टी आणि फ्री तिकिट्स देण्यात आली आहेत. खास बाब म्हणजे, रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशाप्रकारे सुट्टी आणि तिकिट ऑफर करत असल्याची माहिती आहे.
'दरबार'मध्ये रजनीकांत एका पोलिसाची भूमिका साकारणार आहेत. अनेक वर्षांनंतर ते पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. नयनतारा डॉक्टरच्या भूमिकेत दिसतील. या कॉप ड्रामामध्ये सुनिल शेट्टी खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.
ए आर मुरुगादास 'दरबार' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाचा बराचसा भाग मुंबईत शूट करण्यात आला आहे. तर बाकी भाग चेन्नईत शूट झाला आहे. येत्या ९ जानेवारी २०२० ला 'दरबार' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता रजनीकांत यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे 'दरबार'लाही तितकीच प्रसिद्धी, पसंती मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.