Manoj Bajpayee Loksabha Election 2024 : हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात आपली सेकंड इनिंग सुरु केली आहे.  सुनील दत्त, शत्रुघ्न सिन्हा, जया बच्चन, हेमा मालिनी, राज बब्बर अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं जाणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडचा भिखू म्हात्रे अर्थात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) लवकरच राजकारणात उतरणार असल्याचं बोललं जातंय. आगामी लोकसभा निवडणूकीत मनोज बाजपेयीला भाजपाविरोधात इंडिया आघाडीकडून (India Alliance) तिकिट मिळणार असल्याचंही सांगितलं जातंय. या सर्व चर्चांवर आता मनोज बाजपेयीने मौन सोडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज बाजपेयीने सोडलं मौन
राजकारणात जात असल्याच्या चर्चांना अभिनेता मनोज बाजपेयीने उत्तर दिलं आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर मनोज बाजपेयीने पोस्ट लिहित या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ही अफवा कोणी पसरवलं, की कोणाला असं स्वप्न पडलं होतं का? असं मनोज बाजपेयीने विचारलं आहे. या प्रतिक्रियेतून राजकारणात पडणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. मनोज बाजपेयी बिहारमधल्या पश्चिमी चंपारण (West Champaran) लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पश्चिमी पंचारण हे मनोज बाजपेयीचं जन्मस्थळ आहे. 


कशी पसरली अफवा?
सप्टेंबर 2022 पासून मनोज बाजपेयीबाबतच्या अफवांना सुरुवात झाली. 2022 मध्ये मनोज बाजपेयीने बिहारमध्ये आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनोज बाजपेयीच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली. मनोज बाजपेयीचं पश्चिमी चंपारण लोकसभा मतदारसंघात चांगलं वजन आहे. 2009 पासून या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व आहे. भाजपचे संजय जायस्वाल सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आलेत. त्यामुळे भाजापाचा पराभव करायचा असेल तर फॅमिली मॅन मनोज बाजपेयी शिवाय पर्याय नाही हे इंडिया आघाडीला चांगलंच माहिती आहे. 


लालू प्रसाद यादव यांच्या भेटीनंतर मनोज बाजपेयी राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली. बिहार दौऱ्यात लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पूत्र तेजस्वी यादव यांची भेट झाली होती, पण ही भेट राजकीय नव्हती असं मनोज बाजपेयी यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. 


'किलर सूप'मध्ये व्यस्त
मनोज बाजपेयीचा सत्या, गँग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट तसंच फॅमिली मॅन, एक बंदा काफी है या सीरिज चांगलाच गाजल्या. सध्या मनोज बाजपेयी नेटफ्लिक्सवरच सीरिज किलर सूपच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या मालिकेत मनोज बाजपेयीबरोबर कोंकणा सेन प्रमुख भूमिकेत आहे.