दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'सलार' चित्रपटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. एकामागून एक फ्लॉप चित्रपटांनंतर अखेर 'सलार'च्या निमित्ताने प्रभासला यश चाखण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान प्रभास अयोध्या राम मंदिरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं कारण प्रभासने राम मंदिरासाठी 50 कोटी दिल्याचं वृत्त आहे. असं सांगितलं जात आहे की, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या जेवणाचा सगळा खर्च आपण उचलू असं आश्वासन प्रभासने राम मंदिराच्या विश्वस्त समितीला दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा आता अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपला असताना देशभरात त्याचीच चर्चा आहे. याच चर्चेत प्रभास 50 कोटी देणार असल्याचंही वृत्त रंगलं आहे. दरम्यान प्रभासच्या टीमने या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं असून, नेमकं सत्य काय आहे याची माहिती दिली आहे. 


प्रभासने राम मंदिराला 50 कोटी दान केले?


प्रभास सध्या सलार चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. 22 डिसेंबरला अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान मागील काही दिवसांपासून प्रभासने अयोध्येतील राम मंदिरासाठी 50 कोटींचं दान केल्याची चर्चा रंगली आहे. शिवाय, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे आमदार चिर्ला जगिरेड्डी यांनी दावा केला की उद्घाटनाच्या दिवशी जेवणाचा खर्च प्रभास उचलणार आहे.


दरम्यान प्रभासच्या टीमने नेमकं सत्य काय आहे हे उलगडलं आहे. सूत्रांनी ही खोटी बातमी असल्याचं सांगितलं आहे. 


दरम्यान, प्रभासला राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे की नाही हे स्पष्ट नाही. रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण, धनुष यांच्यासह अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. 


प्रभास सध्या कोणत्या चित्रपटांमध्ये व्यग्र?


प्रभासने दिग्दर्शक प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सालार: पार्ट 1 - सीझफायर' ब्लॉकबस्टर हिट केला आहे. तो सध्या दिग्दर्शक मारुती यांच्या 'द राजा साब' या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. त्याच्याकडे 'सलार: भाग 2 - शौर्यंगा पर्वम' आणि संदीप रेड्डी वंगा यांचा 'स्पिरिट' चित्रपटही आहे.