नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून असं कृत्य, ज्यामुळे थेट पोहोचली तुरुंगात
दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीवर नशेत गाडी चालवणे आणि गाडी ठोकण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
मुंबई : दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीवर नशेत गाडी चालवणे आणि गाडी ठोकण्याचा आरोप लावण्यात आला आहे. अभिनेत्री एवढंच करुन थांबली नाही, तर तिने पोलिसांनी याबाबत तिला विचारले असता, त्यांच्यासोबत देखील हुज्जत घातली आणि अश्लील भाषा वापरत शिवीगाळ केली. ज्यामुळे अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव आहे काव्या थापर. तिने अनेक साउथचे सिनेमा केले आहेत. तसेच तिने हिंदी शॉर्ट फिल्मस आणि मोठमोठ्या जाहिरातींसाठी देखील काम केलं आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्विटवरून ही माहिती देण्यात आली आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्रीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री एकच्या सुमारास जुहू येथील जेडब्ल्यू मेरेट हॉटेलजवळ ही घटना घडली. त्यावेळी अभिनेत्री नशेत तिची एसयूव्ही कार चालवत होती.
पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, काव्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कारसह तेथे पार्क केलेल्या वाहनाच्या मागील बाजूस जाऊन धडकली. या संपूर्ण घटनेची माहिती एका वाटसरूने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर जुहू पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांना पाहताच अभिनेत्रीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच अभिनेत्री (काव्या थापर)ने त्यांना पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हाणामारी करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आली.
साऊथच्या चित्रपटात काम केले
काव्या थापर प्रामुख्याने साऊथच्या चित्रपटांमध्ये दिसते. काव्याचा जन्म 20 ऑगस्ट 1995 रोजी महाराष्ट्रात झाला. तिने बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तसेच ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.
काव्या पहिल्यांदा 'तत्काळ' या हिंदी शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. तसेच तिने पतंजली, मेक माय ट्रिप अशा अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला Ee Maaya Peremito हा तिचा पहिला तेलगू चित्रपट होता. काव्या तिच्या बोल्ड फोटोशूटसाठी देखील ओळखली जाते.