सलमान-आमिरला प्रसिद्ध करणाऱ्या दिग्दर्शकाला मोठी शिक्षा, कारावासही होणार?
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राजकुमार संतोषी यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, व्यवहार प्रकरणात मोठी फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर राजकुमार संतोषी यांनी दोन महिन्यांत हे प्रकरण निकाली काढलं नाही तर त्यांना आणखी एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल. असं न्यायालयाने या प्रकरणी म्हटलं आहे.
राजकुमार संतोषी यांचे चेक झाले बाउन्स
चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना साडेबावीस लाख रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात कोर्टानं दोषी ठरवून 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाउन्स प्रकरणावर सुनावणी करत, वरिष्ठ दीवाणी न्यायाधीश एनएच वासवेलिया यांच्या न्यायालयाने असंही म्हटलं आहे की, राजकुमार संतोषी यांना ही रक्कम 2 महिन्यांच्या आत भरावी लागेल, जर त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना अजून एक वर्ष जेलमध्ये राहावं लागेल.
राजकुमार संतोषी यांचे अनिल जेठानी यांच्यासोबत चांगले संबध होते. यासोबतच व्यापार मोठा करण्यासाठी त्यांनी अनिल जेठानीकढून पैसे घेतले होते. या बदल्यात त्यांनी त्यांना २२ लाख रुपयांचे तीन वेगवेगळे चेक दिले होते. मात्र तीन चेक बाऊन्स झाल्यानंतर अनिल जेठानीने पैंशासाठी केस केली. यानंतर अनिल जेठानीने राजकुमार संतोषी यांना नोटिस पाठवली.
नोटिसला उत्तर न मिळाल्याने राजकुमार संतोषी यांच्यावर कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आता राजकुमार संतोषी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, मी सेलिब्रेटी असल्याचा ते फायदा घेत आहेत. 'सेलिब्रेटी असल्यामुळे मला टारगेट केलं जात आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. याप्रकरणी आम्ही अपील करणार आहोत. मला आशा आहे की, मला न्याय मिळेलं. त्यांनी हा देखील दावा केला आहे की, ब्लँक चेकचा दुरुपयोग केला आहे. मी त्यांना सगळे पैसे परत केले आहेत. आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार आमच्यात शिल्लक नाही.