जन्मदिवसच तिच्यासाठी ठरला शेवटचा दिवस... प्रसिद्ध मॉडलचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू
तिचा जन्मदिवसच तिच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. कारण...
मुंबई : आपल्याला सिनेतारकांचे किंवा लाईम लाईटवाले आयुष्य हवेहवेसे वाटत असेल, तरी ते आयुष्य जगणे तसे सोपे नाही. आपल्याला ही स्टार लोक भरपूर पैसा आणि सुखी समाधानी दिसत असली, तरी त्यामागील खरं सत्य काही वेगळंच आहे. म्हणूनच तर या विश्वातील अनेक लोक आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. मधला असा एक काळ होता. जेव्हा अनेक प्रसिद्ध लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.
सध्याच अशाच एका मॉडलची बातमी समोर आली आहे. तिचा जन्मदिवसच तिच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. कारण यानंतर तिचा मृत्यू झाला.
मल्याळी मॉडेल सहानाने 12 मे 2022 रोजी तिचा 21 वा वाढदिवस साजरा केला. 13 मे रोजी रात्री 1 वाजता सहानाच्या मृत्यूची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली.
सहानाच्या आईने सज्जादवर म्हणजेच आपल्या जावयावर आरोप लावत सांगितले आहे की, तिची मुलगी कधीही आत्महत्या करू शकत नाही. सज्जाद आणि त्याचे कुटुंबीय सहानाला त्रास देत होते. सहानाच्या आईने त्यांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला होता, मात्र वेगळे राहूनही सज्जाद सहानाला पैशांसाठी त्रास देत होता. सहानाच्या आईने सांगितले की, सज्जादनेच आपल्या मुलीची हत्या केली आहे.
सहानाच्या आईच्या म्हणण्यानुसार, सहानाला तिच्या वाढदिवशी कुटुंबीयांना भेटायचे होते, पण सज्जादने यावरही बंदी घातली होती.
सहानाने अनेक ज्वेलरी जाहिरातींमध्ये काम केले आहे. खरंतर दीड वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. सहानाच्या आईच्या सांगण्यावरून सहाना आणि त्यांचा जावई आठवडाभरापूर्वी कुटुंबापासून वेगळे झाले आणि भाड्याच्या घरात राहायला गेले.
शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार, सज्जादच्या ओरडण्याचा आवाज त्यांना आला. ते जेव्हा काय झालं हे पाहण्यासाठी गेले, तेव्हा सहाना काहीच रिअॅक्ट करत नसल्याचे दिसले. शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून सज्जादने पोलिसांना सहानाच्या मृत्यूची माहिती दिली.
सज्जाद पूर्वी कतारमध्ये काम करत होता आणि भारतात बेरोजगार होता. 'द इंडियन एक्स्प्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सहानाच्या वाढदिवसाला सज्जाद उशिरा घरी आला, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादानंतर सज्जादला सहाना बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळली.
बाथरूममधून प्लास्टिकची दोरीही जप्त करण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण आत्महत्येचे आहे की, खुनाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.