प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरी देतेय गंभीर आजाराशी झुंज
गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत सांगितलं होतं. एकापाठोपाठ एक आजार व शारीरिक त्रासामुळे जुई त्रस्त झाली होती
मुंबई : मालिका जगतात एक काळ गावणाऱ्या आणि सालस सुनेच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या अभिनेत्रीनं मात्र आजारपणानं खचून न जाता त्याच्या नाकावर टिच्चून आयुष्य जगण्याची कला अंगी बाणवली आहे. काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला Prolactin Tumour, थायरॉईड आणि अशा काही शारीरिक समस्या उदभवल्याचं या अभिनेत्रीनं सर्वांनाच सांगितलं.
साधंसुधं वाटणारं आजारपण गंभीर रुप घेत गेलं आणि सततच्या चाचण्या, डॉक्टरांच्या फेऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्याचा एक भाग बनलं. काही प्रसंगांनी खचून गेलेली आणि पुरती कोलमडलेली ही अभिनेत्री परिस्थितीला स्वीकारत बरीच धीट झाली. आजारपण ते, कवटाळून किती बसायचं असं म्हणज त्यासोबतच ती जगायला शिकली आणि आता बऱ्याच अंशी तिनं दुखण्याखुपण्याला दूरही लोटलं आहे.
मध्यंतरी गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत सांगितलं होतं. एकापाठोपाठ एक आजार व शारीरिक त्रासामुळे जुई त्रस्त झाली होती. याबाबतच तिने आता भाष्य केलं आहे.
दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला तिच्या आजारपणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, ''माझ्यासाठी माझ्या आजारपणाचा काळ हा खूप जास्तच कठीण होता. खूप वर्ष माझं आजारपण सुरू होतं. कालांतराने आजर वाढत गेला. लॉकडाउनचा काळ हा सगळ्यांसाठी खूप निराशाजनक होता.''
''पण लॉकडाउन माझ्यासाठी खूप चांगला गेला. कारण ती दोन वर्ष मी स्वतःसाठी दिली. आपल्याला रडत बसायचं नाही हे माझ ठरलेलं होतं. कारण माझा मुळ स्वभाव रडत बसण्याचा, निराश होण्याचा किंवा हार मानण्याचा नाही. माझी जीवनशैली मी बदलली. डाएट केलं. रडत न बसता कोणाचा आधार न घेता उभं राहायचं हे मी पक्क केलं. माझ्या त्रासामुळे मी जिथे कुठे जाईन त्याची समोरच्याला जाणीवही होता कामा नये त्याप्रमाणे मी स्वतःला तयार केलं. त्यामुळेच आज मी सकारात्मक पद्धतीने काम करत आहे.''
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेमधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने जुई छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर होती. 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.