मुंबई : बॉलिवूडला एकापेक्षा एक सरस चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तसंस्था 'एएनआय'नं दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार संतोषी यांना हृदयसंबंधी त्रास होत असल्यानं मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 


राजकुमार संतोषी यांचे घायल, दामिनी, घातक आणि द लिजेंड ऑफ भगत सिंह असे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये हीट ठरलेत. तर, अंदाज अपना अपना, अजब प्रेम की गजब कहानी सारख्या कॉमेडी सिनेमांतून प्रेक्षकांना हसवण्यातही ते यशस्वी ठरले. 


राजकुमार संतोषी यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात १९८२ साली आलेल्या 'अर्धसत्य' आणि 'विजेता' या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. दिग्दर्शक म्हणून त्यांनी पहिला चित्रपट हाती घेतला १९९० साली... आणि तो होता 'घायल'... घायलमुळे संतोषी यांनी बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख मिळाली. फिल्मफेअरमध्ये 'घायल' या सिनेमानं सात पुरस्कार तसंच दोन राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. 


यानंतर १९९३ मध्ये आलेल्या 'दामिनी'नं संपूर्ण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाला समीक्षकांकडूनही दाद मिळाली. 'दामिनी'साठी संतोषी यांनी पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. 


चायनागेट, पुकार, लज्ज, द लिजेंड ऑफ भगत सिंह, खाकी, हल्ला बोल, फॅमिली, फटा पोस्टर निकला हिरो या सिनेमांचं दिग्दर्शनंही संतोषी यांनी केलं. त्यांचा 'बॅटल ऑफ सारागढी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे.