मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठप्प असलेले अनेक व्यवहार आता अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या कारणामुळे पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यातच कलाविश्वाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेतूनही टांगणीला लागलेली चित्रीकरणाची कामं पुन्हा सुरु करण्याची सकारात्मक बाब समोर आली होती. त्यासंबंधीचीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीनं मनोरंजन क्षेत्रात येत्या काही दिवसांमध्ये कामं पुन्हा सुरु करण्यासाठी जवळपास ३७ पानांच्या कार्यपद्धतीदरम्यान पाळायचे शिष्टाचार नेमके कसे असतील हे स्पष्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सावधगिरी म्हणून काही नियंमांचं पालन करण्याची सक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये काही महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे... 


- संपूर्ण चित्रीकरणादरम्यान प्रत्येक क्र्यू मेंबरला तीन पदर असणारा मास्क आणि सोबतच ग्लोव्जचा वापर करणं बंधनकारक असेल. 


- चित्रीकरणादरम्यान हॅण्डशेक, किसिंग, मिठी मारणं, किंवा कोणत्या प्रकारचा शारीरिक संपर्क टाळावा. 


- सेट, ऑफिस किंवा स्टुडिओच्या ठिकाणी एकच सिगारेट दोन व्यक्तींनी वापरु नये. 


- दोन सहकाऱ्यांमध्ये किमान दोन मीटर इतकं अंतर ठेवावं. 


- येत्या तीन महिन्यांसाठी क्र्यूमध्ये ६० वर्षांवरील वय असणाऱ्या मंडळींना टाळावं. 


लग्नसोहळे, पूजाअर्चा, डान्स सिक्वेन्स अशा कोणत्याची प्रकारची दृश्य हेतूपूर्वक टाळण्याची विचारणाही गिल्डकडून करण्यात आली आहे. 


याव्यतिरिक्त चित्रीकरणापूर्वी ४५ मिनिटं आधीच सेटवर येऊन काही मंडळींनी खुर्च्या, टेबल ठेवण्यासाठी आणि व्यक्तींना उभं राहण्यासाठी आवश्यक त्या खुणा करुन ठेवाव्यात जेणेकरुन संरक्षित अंतर पाळलं जाईल.  शिवाय चित्रीकरणाच्या ठिकाणी शक्य असल्यास बाथरुम, हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था करण्यात येण्याची विचारणा करण्यात आली आहे. 


मेकअप करताना घ्यायची काळजी... 


चित्रीकरणादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या रंगभूषा आणि केशभूषा अर्थात हेअर आणि मेकअपसाठीही काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं सांगण्यात आली आहेत. ज्यामध्ये एका वस्तूचा वापर एकाच वेळी करण्यात यावा, केसांचे विग, एक्स्टेंशन वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर स्वच्छ करावेत, शक्य असेल तेव्हा प्रत्येक वेळी स्वत:चा मेकअप किट वापरावा असं सांगण्यात आलं आहे. शिवाय मेकअप आर्टीस्टनेही सेटवर सतत मास्क आणि ग्लोव्जचा वापर करणं बंधनकारक असणार आहे. 


 


रिऍलिटी शो साठी वेगळे आदेश


रिऍलिटी शोमध्ये प्रेक्षकांची उपस्थितीही तितकीच महत्त्वाची असते. पण, गिल्डकडून यावेळी मात्र प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेसाठी असणाऱ्या आसनांच्या संख्येत ५० टक्क्यांनी कपात करण्यास सांगितलं आहे. शिवाय प्रत्येक प्रेक्षकामध्ये एक मीटरचं अंतर राखणं आवश्यक असेल. 


प्राथमिक पातळीवर या सर्व नियमांचं पालन करुन प्रायोगिक तत्वावर चित्रीकरण करण्यात येईल. ज्यानंतर ते अंमलात आणले जातील अशी माहिती समोर येत आहे.