मुंबई : पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे  ४० जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून या हल्ल्याचा तीव्र विरोध केला जात आहे. पाकिस्तानकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या या अशा हल्ल्यांमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. परिणामी सर्वच क्षेत्रांत पाकिस्ताविरोधी पवित्रा पाहायला मिळत आहे. ज्याचे पडसाद क्रीडाविश्वासोबतच कलाविश्वातही पाहायला मिळत आहेत.
  
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉई या संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी  पाकिस्तानच्या कलाकारांवर प्रतिंबध घालण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी कलाकार, अभिनेते यांच्यासोबत अभिनय करण्यास निर्मात्यांकडून भाग पाडले जाते. अशी सक्ती करणाऱ्या निर्मात्यांविरोधात देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, असे पंडित म्हणाले. आम्ही यासंदर्भात अधिकृत घोषणा करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सीमेपलिकडून नेहमीच असे भ्याड हल्ले करण्यात येतात ज्याचं उत्तरही भारतीय लष्कराकडून वेळोवेळी देण्यात येतं. वारंवार होणारे हल्ले आणि तणावाची परिस्थिती उद्भवत असली तरीही बऱ्याचदा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याची सक्ती ही संगीत कंपन्यांकडून केली जाते. अशां कंपन्यांना लाज वाटायला हवी. ते कोडगे झाले आहेत. पण आपण कलाकार मंडळींनी या अशा संगीत कंपन्यांना आणि  चित्रपट निर्मात्यांना माघार घेण्यास भाग पाडायला हवे', अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.


दहशतवाद्यांकडून भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची शपथ घेतली. पण, अशी शपथ घेतलेले चित्रपट क्षेत्रातील लोक आपल्या शब्दावंर ठाम राहत नाही. काही दिवस दिखावा करुन माघार घेतात. १४ तारखेला झालेल्या या हल्ल्याच्या वेळी संघटनेचे सल्लागार हे जम्मूत होते. तेथील  एकूणच परिस्थिती पाहून त्यांमी हळहळ व्यक्त केली.


पंडित म्हणाले की, जम्मूत झालेल्या या हल्ल्यानंतर येथील परिस्थिती बदद्ल आपण किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज देखील करु शकत नाही. यात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी खूप वर्ष लागतील. एखादा व्यक्ती मोठ्या प्रमाणात आरडीएक्स घेऊन जम्मू-काश्मिर सारख्या भागात लपून कशा येऊ शकतो ? इतके सारे घडले असताना देखील आपल्या मनोरंजन क्षेत्रातील काही मंडळी ही पाकिस्ताच्या अभिनेत्यांकडे पाहते. आता जे झालं ते खूप झालं, आता या अशा प्रकाराला थांबवायला हवे.


शहिदांसाठी मुंबई चित्रनगरी बंद


या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी १७ फेब्रुवारीला  मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीतील कामकाज दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. सिनेकामगार संघटनेतर्फे हा बंद ठेवण्यात आला होता. तसेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉइज' (एफडब्लूआयसीई) १७ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहली असून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत 'ब्लॅक डे' पाळला गेला.