मुंबई :  ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याविषयी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या व्यक्तीरेखा चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने थेट सोशल मीडियावरुन या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला. पण, या गोष्टी आधीच घडून गेल्या आहेत, असं म्हणत हे 'देजा-वू' असल्याचं दिग्दर्शक मधुर भांडारकर याने स्पष्ट केलं आहे. साधारण वर्षभरापूर्वी भारतातील राष्ट्रीय आणिबाणी वर भाष्य करणाऱ्या 'इंदू सरकार' या चित्रपटाचाही असाच विरोध करण्यात आला होता. तो चित्रपटही एका पुस्तकावर आधारित होता. पण, पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मात्र त्याचा कोणीच विरोध केला नव्हता, हा मुद्दा त्याने इथे मांडला. 


काय आहे 'देजा-वू'?


सद्यस्थितीला घडणारी घटना अनेकदा यापूर्वीही घडलेली आहे. मुख्य म्हणजे आपल्याला ती घटना जशीच्या तशी आठवत आहे, या एकंदर स्थितीला 'देजा-वू' म्हणून संबोधलं जातं. 



मधुरने इथे मांडलेलं 'देजा-वूचं' उदाहरण पाहता, 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'च्या वाट्याला आलेला हा वादाचा विळखा काही बाबतीत अपेक्षित होता, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर 'द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. २००४ ते २००८ या काळात डॉ. सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या संजय बारू लिखित एका पुस्तकावर या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरही साधारण असंच वातावरण पाहिलं गेलं होतं, अनेकांनी या पुस्तकाकडे दुर्लक्षही केलं होतं. पण, चित्रपटाला मात्र मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे, ही एका घटनेची पुनरावृत्तीच आहे असं मधुरने स्पष्ट केलं.