मुंबई : भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेकांनाच आदर्शस्थानी असणाऱ्या फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या कार्याचा आढावा घेणारा चित्रपट लवकरच साकारण्यात येणार. नुकतंच या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याची पहिली झलक सर्वांच्या नजरेस आली. सोशल मीडियावर हे छायाचित्र पाहताच अनेक कुतूहलपूर्ण प्रश्नांना सुरुवात झाली की हा अभिनेता आहे तरी कोण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका उत्तुंग व्यक्तीमत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळालेला हा अभिनेता आहे, विकी कौशल. 'राझी' या चित्रपटातून एका हेराच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारी मेघना गुलजार पुन्हा एकदा अशीच एक प्रभावी आणि तितकीच प्रोत्साहनपर कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळीसुद्धा तिला साथ मिळत आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल याची. विकी आणि मेघनाच्या या समीकरणातून फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर, त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे, 


मानेकशॉ यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त विकीनेच या चित्रपटातील त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा सैन्यदल अधिकाऱ्याच्या रुपात दिसणारा विकी सर्वांचं लक्ष वेधत आहे. एखाद्या गोष्टीवर खिळलेली नजर, चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि स्मितहास्य आणि वेगळाच रुबाब त्याच्या या लूकमधून पाहायला मिळत आहे. 



'भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या निर्भीड देशभक्तीचा इतिहास उलगडण्याची संधी मिलाल्यामुळे मी या क्षणाला भावूक झालो आहे. माझ्यासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब आहे', असं कॅप्शन लिहित विकीने त्याच्या या भूमिकेतील पहिला आणि तितकंच आश्वासक छायाचित्र सर्वांसमक्ष आणलं. 


चित्रपटाची कथा वाचताच विषय ऐकून विकीने या चित्रपटातील भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती समोर येत आहे. २०२१ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाचा विषय आणि कथानकाची एकंदर व्याप्ती पाहता पूर्वतयारीसाठी हा वेळ घेण्यात येणार आहे. या चित्रपटातून फाळणी, काश्मीर मुद्दा आणि १९७१ मधील भारत- पाकिस्तान युद्धावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यामुळे उरी मागोमाग पुन्हा विकीच्या अभिनयाचा आणि त्याचा स्वत:चा वेगळाच रुबाब पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असंच म्हणावं लागेल.