पहिला मराठी वेबसिनेमा `संतुर्की`तील गाणं प्रदर्शित
पाहा `संतुर्की`तील हे गाणं...
मुंबई : युट्युबवर पहिल्यांदाच मराठीतून वेबसिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीतील पहिल्या 'संतुर्की' या वेबसिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. 'संतुर्की'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता या वेबसिनेमातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
नितीन पवार दिग्दर्शित 'संतुर्की' वेबसिनेमातील 'येडा पिसा जीव' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. वेबसिनेमाच्या पार्श्वसंगीताला सौरभ साळुंखे यांनी आवाज दिला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसीरीज "गावाकडच्या गोष्टी" आता एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या वेबसीरिजच्या दोन पर्वांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असता तरीही हा एक अल्पविराम आहे. हेच या नव्या वळणावरुन स्पष्ट होत आहे. कारण, 'कोरी पाटी प्रोडक्शन'च्या 'गावाकडच्या गोष्टी'मधील लोकप्रिय जोडी 'संत्या-सुरकी' यांची प्रेमकथा आता 'संतुर्की'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संतोष राजेमहाडीक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलिकर, समाधान पिंपळें हे कलाकार देखील यात झळकणार आहेत. संत्या-सुरकीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्त्व त्याचं लग्न होऊ शकत नाही. मात्र सुरकीचं लग्न होतं आणि लग्नानंतर ती संतोषसमोर आल्यानंतर त्याची होणारी अवस्था, जीवापाड प्रेम करुनही हे दोघं एकमेकांपासून का वेगळे झाले? अशा बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं 'संतुर्की'मधून मिळणार आहेत. येत्या १ जुलैला हा वेबसिनेमा युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.