`मोदींना म्हणावं आधी स्वत:च्या कुटुंबाची कागदपत्र दाखवा`
दिग्दर्शक अनुराग कश्यपची मागणी
मुंबई : आंदोलनकर्त्यांचा विरोध डावलून मोदी सरकारकडून दोशात सीएए कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वच स्थरातून विरोध होत आहे. शिवाय बॉलिवूडकरांनी या मुद्द्यावर आपले परखड मतं मांडली आहेत. दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमी मोदी सरकार विरोधात बेधडक वक्तव्य करत असतो.
अनुराग कश्यपने सुरवातीपासूनच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कायदा लागू झाल्यानंतर अनुरागने मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
सर्वात आधी मोदींनी त्यांनी पॉलिटिकल सायन्स या विषयात घेतलेली पदवी जनतेला दाखवावी, पंतप्रधान मोदींनी स्वत:चा जन्म दाखला दाखवावा, त्यांच्या वडिलांचा आणि संपूर्ण कुटुंबियांचा जन्मदाखला देखील सार्वजनिक करावा आशी मागणी देखील अनुराग कश्यप यांनी केली आहे.
आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं हे विधेयक लागू करण्याविषयी शुक्रवारी एक नोटिफिकेशन काढलं. १० जानेवारीपासून नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ देशभरात लागू करण्यात आल्याचं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं गेलंय.
एका गॅझेट अधिसूचनेद्वारे, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी देशभरात केली जात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. 'नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (२०१९ चं ४७) च्या कलम १ चं उप-कलम (२) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकार १० जानेवारी २०२० ही तारीख अधिनियमांचे प्रावधान प्रभावी होण्यासाठी निश्चित करत आहे' असं या अधिसूचनेत म्हटलं गेलंय.