मुंबई : खिलाडी कुमार अक्षयने अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना मागे टाकत एक नवा रेकॉर्डच आपल्या नावे केला आहे. 'फोर्ब्स'ने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अक्षय कुमारचं नाव चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणारा अक्षय बॉलिवूडचा एकमेव अभिनेता ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फोर्ब्स'ने जाहीर केलेल्या यादीनुसार, १ जून २०१८ ते १ जून २०१९ या काळात अक्षयची अंदाजे कमाई जवळपास ६५ मिलियन डॉलर म्हणजेच ४६५ कोटी इतकी आहे. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीमध्ये अक्षय कुमारव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभिनेत्याचा समावेश नाही.



सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीमध्ये हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन पहिल्या क्रमांकावर आहे. 'जुमांजी' आणि 'फास्ट अॅन्ड फ्यूरियस' यांसारख्या अॅक्शन चित्रपटांनंतर ड्वेन प्रेक्षकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध झाला. ड्वेनने जून २०१८ ते जून २०१९ यादरम्यान ८९.४ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ६४० कोटींची कमाई केली आहे. 


ड्वेन जॉनसनंतर या यादीमध्ये 'अॅव्हेंजर एंडगेम'चे दोन अभिनेते क्रिस हेमस्वर्थ आणि रॉबर्ट डाउनी जूनियर यांचा समावेश आहे. क्रिस हेमस्वर्थची कमाई ७६.४ मिलियन डॉलर आणि रॉबर्ट डाउनी जूनियरची कमाई ६६ मिलियन डॉलर इतकी आहे. 


अक्षयनंतर जॅकी चैन ५८ मिलियन डॉलर म्हणजे ४१५ कोटींच्या कमाईसह ५व्या क्रमांकावर आहे. 


गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्यांच्या यादीमध्ये अक्षयसोबत सलमान खानचाही समावेश होता. गेल्या वर्षी या यादीमध्ये अक्षय कुमार ७व्या क्रमांकावर तर सलमान खान ९व्या क्रमांकावर होता.


अक्षय त्याच्या कमाईतील काही भाग दानही करताना दिसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने आसामच्या चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आणि काजीरंगा नॅशनल पार्कसाठी १-१ कोटींची मदत केली होती. त्याशिवाय त्याने 'भारत के वीर' या नावाने एक अॅप लॉन्च केलं आहे. याद्वारे तो शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत असतो.


गेल्या वर्षी अक्षयने सलग सुपरहिट चित्रपट देत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यंदा १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपार गल्ला जमवला आहे.