मुंबई : कृष्णधवल चित्रपटाला रंगीत छटा प्राप्त होण्याचा काळ आपल्या सोज्वळ अभिनयाने गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांचे पती प्रख्यात चित्रकार, सिनेनिर्माते-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे यांनी त्यांच्या अनेक आठवणी, त्यांचे ४३ वर्षांचे सहजीवन आणि चित्रपटविश्वातील कटु-गोड अनुभव पुस्तकरूपात बंदिस्त केले आहेत. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ह्या श्री. प्रकाश भेंडे लिखित पुस्तकाचा तसेच ऑडीयो सीडीचा प्रकाशन सोहळा गुरूवार दि. ३१ मे २०१८ रोजी संध्याकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. केन्द्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीत होणार आहे.                                            


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पन्नासहून अधिक मराठी, हिंदी, तेलगु आणि छत्तीसगडी भाषेतील रौप्य महोत्सव गाजवल्या चित्रपटांमधून उमा भेंडे यांनी प्रमुख भुमिका साकारल्या. सालस-सात्विक व्यक्तिमत्त्व असलेल्या उमाताईंचा अभिनय आणि भूमिकाही तितक्याच सोज्वळ होत्या. मुळच्या कोल्हापूरकर असलेल्या उमा भेंडे यांचे मूळ नाव अनुसया साक्रीकर होते. पण, लता मंगेशकर यांनी त्यांचे नामकरण उमा असे केले. प्रकाश भेंडे हे व्यवसायाने एक चित्रकार आहेत. पण, अभिनयाच्या वेडापायी तेही चित्रपटविश्वात रमले. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांचे सूत ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळले. पण, त्यांचा विवाह म्हणजे अनेक अडथळ्यांची शर्यत होती. लग्नानंतर उमा भेंडे यांनी चित्रपटातून सन्यास घेतला होता. पण, पुढे असेकाही घडले, की त्यांनी स्वत:ची श्रीप्रसाद चित्र नावाची निर्मिती संस्था स्थापन केली. त्याद्वारे त्या पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकल्या.


उमा आणि प्रकाश भेंडे यांच्या ‘भालू’ या चित्रपटातील ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ह्या आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गीताच्या रचने प्रमाणेच ह्या जोडीचे सहजीवन होते. म्हणून ह्या पुस्तकालाही प्रकाश भेंडे यांनी तेच शीर्षक दिले. चित्रपटविश्वात वावरताना भेंडे दांपत्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अनेक प्रस्थापित सिनेकर्मींचा आलेला अनुभव व त्याचे अनेक गमतीदार आणि तितकेच मनाला चटका लाव किस्से ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ह्या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळणार आहेत.


अभिनेत्री कै. उमा भेंडे यांचा जन्म ३१ मे १९४५ रोजी झाला तो वार गुरूवार होता आणि त्या दत्तभक्त होत्या. त्यांच्या मृत्युपश्चात आलेली त्यांची जयंती ३१ मे २०१८, ही देखील गुरूवारी आल्याने आणि त्याच दिवशी पुस्तक प्रकाशित होत असल्याने, भेंडे कुटुंबियांच्या दृष्टीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा दुग्धशर्करा योग आहे. मनोरमा प्रकाशन वितरीत या पुस्तकासाठी भेंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय संकलक अनिल गांधी आणि सहायक राजु सुतार यांचे विशेष योगदान आहे.