मुंबई : यंदाच्या दिवाळीमध्ये अजय देवगनचा गोलमाल अगेन आणि आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार हे दोन चित्रपट रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवरच्या कमाईमध्ये गोलमाल अगेननं सिक्रेट सुपरस्टारला मागे टाकलं आहे. पहिल्याच दिवसापासून गोलमाल अगेन प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. पहिल्या चार दिवसांमध्येच गोलमाल अगेन १०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोलमाल अगेननं पहिल्या आठवड्यात १३६.०७ कोटींची कमाई केली आहे, असं ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगनबरोबर अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, जॉनी लिवर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, वृजेश हिरजी, तब्बू आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कहाणी जमनादास अनाथ आश्रमाच्या सहा मुलांभोवती फिरते. यामध्ये गोपाल (अजय देवगन), लकी (तुषार कपूर), माधव (अर्शद वारसी), लक्ष्मण १( श्रेयस तळपदे), लक्ष्मण २( कुणाल खेमू) आणि पप्पी(जॉनी लिवर) यांचा समावेश आहे.


तर सिक्रेट सुपरस्टारनं पहिल्या आठवड्यात जवळपास ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आमीर खानचा सिक्रेट सुपरस्टार हा चित्रपट एका काश्मिरी मुलीभोवती फिरतो. ही मुलगी गायिका बनण्याच स्वप्न बघत असते. आपली ओळख लपवून इंसिया गायिका बनण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करते. दंगलमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी जायरा सिक्रेट सुपरस्टारमध्ये मुख्य भूमिकेत आहे.