मंत्र्याची मुलगी आमच्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली, गोविंदाच्या पत्नीचा खुलासा
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने कशाप्रकारे एका मंत्र्याची मुलगी आपल्या घरी 20 दिवस मोलकरीण बनून राहिली याचा खुलासा केला आहे. अनेकदा ती रात्री गोविंदाची वाट पाहत थांबलेली असायची असंही तिने सांगितलं.
1990 च्या दशकात गोविंदा सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी होता. अभिनयासह त्याच्या डान्सचे लाखो चाहते होते, जे आजही आहेत. त्याच्या चाहत्यांमध्ये तरुणींचा समावेश अधिक होता. त्या दिवसांमध्ये त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी सेटवर गर्दी करत असत. अनेक तरुणी तर त्याला पाहिल्यावर बेशुद्ध पडायच्या असा त्याच्या पत्नीचा दावा आहे. यादरम्यान एका तरुणीने तर गोविदांच्या प्रेमात हद्द पार केली होती. गोविंदाची ही चाहती त्याच्या घरात तब्बल 20 दिवस मोलकरीण बनून राहिली होती. नंतर ती एका मंत्र्याची मुलगी असल्याचं उघड झालं होतं असा खुलासा सुनिता अहुजाने केला आहे.
Timeout with Ankit पॉडकास्टवर दिलेल्या मुलाखतीत सुनिता अहुजाने गोविंदाची फॅन फॉलोईंग किती होती याबद्दल सांगितलं. यावेळी तिने एका घटनेचा उल्लेख करत माहिती दिली की, "एक चाहती जवळपास 20 ते 22 दिवस आमच्या घरी राहिली होती. ती मोलकरीण म्हणून आमच्या घरी राहत होती. तिच्याकडे पाहिल्यावर ती एका चांगल्या घरातील वाटत होती. मी माझ्या सासूबाईंना तिला घर साफ करायला किंवा भांडी धुवायला जमत नसल्याचं सांगितलं. नंतर ती एका मंत्र्याची मुलगी आणि गोविंदाची चाहती असल्याचं उघड झालं".
पुढे तिने सांगितलं की, "मी त्यावेळी तरुण होते आणि माझ्या मनात संशय निर्माण झाला. ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि गोविंदाची वाट पाहायची. मला आश्चर्य वाटत होतं. अखेर मी तिची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ती रडू लागली आणि मी गोविंदाची चाहती असल्याचं सांगितलं. यानंतर तिचे वडील आले. सोबत ते अनेक गाड्या घेऊन आले होते. मला वाटतं ती आमच्या घरी जवळपास 20 दिवस काम करत होती. असा त्याचा चाहतावर्ग होता".
गोविंदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी 1987 मध्ये लग्न केलं. त्यावेळी अभिनेत्याने लग्न केल्याचा परिणाम त्याच्या करिअरवर होण्याची भिती असल्याने जाहीर केलं जात नव्हतं. कित्येक वर्षं गोविंदा आणि सुनिताने हे लग्न सर्वांपासून लपवून ठेवलं. अखेर जेव्हा मुलगी एक वर्षाची झाली तेव्हा त्यांनी जगाला हे सत्य सांगितलं.