Grammy Awards Winner Mandisa Passes Away : अमेरिकन गायिका आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती मंडिसाचा मृत्यू झाला आहे. ती 47 वर्षांची होती. मंडिसाचा मृतदेह फ्रँकलिनमधील टेनेसी या ठिकाणी असलेल्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला. मंडिसाच्या टीमने तिच्या मृत्यूच्या पुष्टी केली आहे. मंडिसाच्या मृत्यूमुळे संगीत उद्योगात खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंडिसाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. याद्वारे तिचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. "काल मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. आम्ही या घटनेची पुष्टी करत आहोत. या क्षणी आम्हाला तिच्या मृत्यूचे कारण किंवा इतर तपशीलाबद्दल कोणतीही माहिती नाही. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळ मित्रांसाठी प्रार्थना करा. मंडिसा ही जगभरातील लोकांसाठी सत्याचा आवाज होती. तिने तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि ज्यामुळे ती इतरांसाठी प्रेरणादायी होती", असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच तिचा एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. 


चाहत्यांना धक्का


मंडिसाच्या या पोस्टवर  तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी कमेंट करत तिला "भावपूर्ण श्रद्धांजली" वाहिली आहे. तर अनेकांनी "ती या जगात नाही, यावर आम्हाला विश्वास बसत नाही", असेही कमेंटमध्ये म्हटले आहे. 



गायनासाठी जिंकला मानाचा ग्रॅमी अवॉर्ड


दरम्यान मंडिसा लिन हंडली असे तिचे पूर्ण नाव होते. ती 47 वर्षांची होती. मंडिसाचा जन्म कॅलिफोर्नियाच्या सायट्रस हाइट्स या ठिकाणी झाला. अमेरिकन आयडॉल स्टार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेती म्हणून तिला ओळखले जाते. मंडिसाला तिच्या अप्रतिम आवाज आणि गायनासाठी ओळखले जाते. तिने 2006 मध्ये अमेरिकन आयडॉलमध्ये भाग घेतला होता. 


या कार्यक्रमातून गायनाने तिने लोकांनी मनं जिंकली. या कार्यक्रमात तिला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 2007 मध्ये तिचा ‘ट्रू ब्युटी’ नावाचा पहिला म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला. यानंतर मंडिसाने अनेक सुपरहिट गाणी गायली. तिचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिने तिच्या गायनासाठी मानाचा ग्रॅमी अवॉर्डही जिंकला होता. मात्र तिच्या अकस्मात निधनामुळे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.