Birthday Special: १५व्या वर्षी रेखा झाली होती ‘द किसींग क्रायसिस ऑफ इंडिया’
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस. १० ऑक्टोबर १९५४ ला रेखाचा जन्म झाला होता. आज ती तिचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून रेखाने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस. १० ऑक्टोबर १९५४ ला रेखाचा जन्म झाला होता. आज ती तिचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून रेखाने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती.
रेखाचे वडील जॅमिनी गणेशन तमिळ सिनेमात काम करायचे तर आई पुष्पावल्ली तेलगु सिनेमात काम करत होती. रेखाने बालकलाकार म्हणून १९६६ साली आलेल्या रंगुला रत्नम या सिनेमात काम केले होते. त्यानंतर तिने ‘ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सी.आय.डी’ सिनेमातून अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये ‘अंजाना सफर’ या सिनेमातून पदार्पण केले होते. तेव्हा रेखा केवळ १५ वर्षांची होती. रेखाच्या या सिनेमातील एक किस्सा फारच लोकप्रिय आहे.
या सिनेमाच्या एका रोमॅंटीक गाण्याच्या शूटिंगसाठी रेखा गेली होती. या सिनेमाच्या दिग्दर्शकाने जसेही अॅक्शन म्हटले, तसे अभिनेता विश्वजीतने रेखाच्या ओठांवर किस करण्यास सुरूवात केली. आणि पुढील ५ मिनिटे ते किस करतच राहिले. दिग्दर्शकाने कट सुद्धा म्ह्टले नाही. त्यानंतर सेटवर लोक शिट्या वाजवायला लागले होते. रेखासाठी हा अनुभव सर्वात भयानक होता.
हे प्रकरण इथेच थांबलं नाही. सिनेमाच्या रिलीज वेळी सेन्सॉर बोर्डने हा सीन कापण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हा याविरोधात निर्माते कोर्टात गेले होते. त्यानंतर हा वाद इतका वाढला होता की, एशियाच्या लाईफ मॅगझिनमध्येही यावर लेख छापून आला होता. या लेखाचं टायटल ‘द किसींग क्रायसिस ऑफ इंडिया’ असं दिलं होतं.
तसे तर रेखाने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण सिनेमे सर्वात जास्त गाजले ते जितेंद्र सोबतचे. रेखाने जितेंद्रसोबत २६ सिनेमे केले. त्यातील १५ हिट झाले होते. रेखाने आतापर्यंत एकूण १८० सिनेमात काम केलंय. या प्रवासात रेखाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले. पण सर्वात चर्चा झाली ती अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्याची.
रेखाने नेहमीच एक बोल्ड अभिनेत्री राहिली आहे आणि तिच्याबद्दल लोक काय विचार करतात याचं तिला कधीही देणंघेणं राहिलं नाही. रेखाने अनेक इव्हेंटमध्ये कुंकू लावून गेली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तिला याबाबत विचारले गेले तर तिने वेगवेगळी कारणे सांगितली. पण आजही मानलं जातं की, रेखा अमिताभ बच्चन यांच्या नावाचं कुंकू लावते.