Richa Chadha Describe Heeramandi Set : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'हिरामंडी' ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख  आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या वेबसीरीजच्या पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता अभिनेत्री ऋचा चड्ढाने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋचा चड्ढाने नुकतंच हिंदुस्तान टाईम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा असतो, याबद्दल सांगितले. त्यासोबतच तिने त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर काय काय सुविधा दिल्या जातात, याबद्दलही भाष्य केले. ऋचा चड्ढाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आता ती 'हिरामंडी' या वेबसीरीजमध्ये झळकत आहे. यात ती लज्जो हे पात्र साकारत आहे. 


सर्वात मोठ्या सेटपैकी एक


या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, 'हिरामंडी' या वेबसीरीजचा सेट हा भन्साळींच्या इतर सर्व सेटपेक्षा सर्वात मोठा असावा. मी जेव्हा पहिल्यांदा त्या सेटवर पोहोचली. तेव्हा तिथे माझ्या पात्राबद्दल चर्चा सुरु होती. 'हिरामंडी'च्या सेटला बनवण्यासाठी खूप वेळ लागला. मला असं वाटतं की हा सेट हा सर्वात मोठ्या सेटपैकी एक असावा. हा सेट फिल्मसिटीच्या सर्वात मोठ्या क्षेत्रफळावर पसरलेला आहे. 


परफ्यूमपासून ओढणीपर्यंत वस्तू विकत घेण्याची सोय


'हिरामंडी'साठी बनवण्यात आलेला सेट खूपच सुंदर आहे. तिथे प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळी जागा आहे. त्या सेटवर किचनची जागा वेगळी आहे. बेडरुम आहे. तसेच प्रत्येक पात्रासाठी वेगवेगळ्या रुम्स बनवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या सेटवर अंगण, बाल्कनी, एक कॅफे आणि एक बॉलरुमही आहे. त्यांचा हा सेट एखाद्या शहराप्रमाणेच वाटतो. या ठिकाणी अनेक दुकानेही आहेत. ज्यात परफ्यूमपासून ओढणीपर्यंत अनेक गोष्टीही मिळतात. आम्ही जिथे शूटींग करत होतो, तिथे सुरुवातीला एक दर्गाही होता. आम्हाला सेटवर फोन वापरण्यास परवानगी नव्हती. जर मला फोन वापरण्यास परवानगी असती, तर मी तिथे सर्व काही रेकॉर्ड केले असते. या सेटवर बारीकसारीक गोष्टीही दिसत होत्या, असे ऋचा चड्ढाने सांगितले. 


दरम्यान 'हिरामंडी' ही वेबसीरिज येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. या सीरिजद्वारे स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीतील जीवन कसं होतं, त्यांचा समाजात वावर कसा असायचा अशा स्त्रियांची कहाणी यातून मांडली जाणार आहे. ही वेबसीरिज 190 देशात प्रदर्शित होणार असून याचे 8 भाग असणार आहेत.