चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे बिग बींचे होर्डिंग्स हटविले
कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी लावण्यात होर्डिंग्स लावण्यात आले होते.
मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशात आता कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्यावर पोहोचली आहे. कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी जागो-जागी अनेक योजना राबवल्या जात आहे. दरम्यान उस्मानाबादमध्ये एका गावात जनजागृती करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांचे होर्डिंग्स लावण्यात आले. ‘जिस डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था, उसे कोरोना वायरस ने पकड लिया…'असा उल्लेख असलेले होर्डिंग्स लावण्यात आले.
परंतु बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे हे होर्डिंग्स हटविण्यात आल्याचं वत्त ‘एनडीटीव्ही’ने प्रसारित केलं आहे. बिग बींना कोरोनाची लागण झाल्यानंतर याठिकाणी जनजागृती करण्यासाठी त्यांच्या 'डॉन' चित्रपटातील गाजलेल्या डायलॉगचा वापर काही शब्द रचना बदलून केला.
विनाकारण घराबाहेर पडू नका, घरात राहून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. या उद्देशाने हे होर्डिंग्स जागो-जागी लावण्यात आले होते. परंतु बिग बींच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत बॅनर हटविले आहेत, असं लोहारा नगर पंचायत मुख्य अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितलं.
गेल्या २४ तासात भारतात विक्रमी वाढ झाली आहे. शनिवार सकाळी ८ वाजेपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशात ३८ हजार ९०२ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशात कोरोना संक्रमितांची संख्या १० लाख ७७ हजार ६१८ झाली आहे. एका दिवसात ५४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २६ हजार ८१८ लोकांनी आपला जीव गमवला आहे.