मुंबई : कधीकधी आपण नकळत कोणा एका व्यक्तीच्या बोलण्यात इतके वाहत जातो, की त्या व्यक्तीची आपल्याला सवय होते. इतकी की न पाहता, फारसं न ओळखताही त्या व्यक्तीशी बोलूनही आपल्याला त्याचं असणंच महत्त्वाचं होऊन जातं. ऑनलाईन डेटिंग अॅप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या चॅटिंगमध्ये याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व उदाहरणांमध्ये काही उदाहरणं हेवा वाटणारी असतात. तर काही मात्र सतर्क करणारी ठरतात. अशा या ऑनलाईनच्या जाळ्यात एक मोठा कलाकार अडकल्याचं वृत्त समोर आलं. 


या 31 वर्षीय अभिनेता आणि निर्मात्याचं नाव आहे जेम्स मोरोसिनी. तो ज्या मुलीशी फेसबुकवरून बोलत होता तिचं नाव होतं बेक्का. तिच्या प्रोफाईलचा फोटोही भुरळ पाडणाराच होता. 


जेम्स याच प्रकरणात कॅटफिशिंगचा शिकार झाला. कॅटफिशिंग म्हणजे कोणत्याही व्यक्तीला फसवण्यासाठी ऑनलाईन खोटी ओळख तयार करणं होय. 


सुत्रांच्या माहितीनुसार 'आय लव्ह माय डॅड' या चित्रपटात जेम्सच्या आयुष्यातील ही सत्यघटना महत्त्वाची भूमिका बजावते. साधारण दहा वर्षांपूर्वी जेम्सचे त्याच्या वडिलांशी अतिशय तणावपूर्ण संबंध होते. 


जेम्सनं त्याच्या वडिलांपासून दूर राहण्याचाही निर्णय घेतला होता. पण, वडिलांनी मुलाशी नातं टिकवून ठेवण्यासाठी एका वेगळ्या मार्गाचा अवलंब केला.


एका सुंदर मुलीचा फोटो वापरत त्यानं खोटं फेसबुक अकाऊंट सुरु केलं आणि स्वत:च्याच मुलाला रिक्वेस्ट पाठवली. बेक्का नावानं त्यांनी मुलाला रिक्वेस्ट पाठवली आणि ती जेम्सनं स्वीकारताच त्यांनी त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. 


जेम्स 20 वर्षांचा असताना हे सर्व घडलं . त्या दोघांची आवड जुळत होती. त्यामुळं त्यांनी बोलणं सुरु केलं. हे बोलणं तोपर्यंत सुरु होतं जेव्हापर्यंत जेम्सनं बेक्काच्या अकाऊंटवर वडिलांचा इमेल आयडी पाहिला नव्हता. 



वडिलांनी हे अकाऊंट आपल्या मुलाशी संपर्कात राहण्यासाठी तयार केलं होतं. पण, जेम्सला जेव्हा हे वडीलच असल्याचं कळलं तेव्हा तो क्षण संतप्त आणि खजिल करणारा ठरला.  कारण आधी त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता. पण, चित्र स्पष्ट होताच आपल्यासाठी वडिलांनी केलेले प्रयत्न पाहून तो भावूक झाला. यानंतर वडिलांशी त्यानं बोलणंही सुरु केलं होतं. 


अनेकदा ऑनलाईन फसवणुकीमुळं बऱ्याच गोष्टी बिघतात. पण, जेम्सच्या बाबतीत मात्र याउलट घडलं होतं.