Mukesh Ambani Proposed Nita Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचं नाव नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतं. कधी कौटुंबिक कार्यक्रम तर कधी आंततराष्ट्रीय कलाकारांनी कार्यक्रमांना लावलेली उपस्थिती यामुळे अंबानी कुटुंबाची नेहमीच दखल घेतली जात असते. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांना फिल्मी तडका नेहमीच असतो. दरम्यान मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची लव्हस्टोरीही अशीच फिल्मी आहे. त्यांच्या लव्हस्टोरीचा किस्साही असाच रंजक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांची भेट झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांनी रस्त्याच्या मधोमध कार थांबवत नीता अंबानी यांना प्रपोज केलं होतं. 


मुकेश अंबानी यांनी अशाप्रकारे केला होता नीता अंबानी यांना प्रपोज


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी बीबीसीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी आपली लव्हस्टोरी सांगितली होती. याचवेळी नीता अंबानी यांनी मुकेश अंबानी यांनी आपल्याला कसं प्रपोज केलं होतं हेदेखील सांगितलं होतं. "आम्ही कारने पेडर रोडवरुन जात होतो. हा मुंबईतील सर्वात जास्त वाहतूक असणाऱ्या रस्त्यांपैकी एक आहे. रात्रीचे 8 वाजले होते. त्यावेळी रस्त्यावर खूप ट्राफिक होतं," असं नीता अंबानी यांनी यावेळी सांगितलं होतं. 



पुढे त्यांनी सांगितलं होतं की "मुकेश अंबानी यावेळी अचानक रस्त्यावर गाडी थांबवली होती. नेमकं काय सुरु आहे असा विचार मी करत होते. त्याचवेळी त्यांनी मला माझ्याशी लग्न करशील का? अशी विचारणा केली होती. त्यावेळी आमची भेट होऊन जास्त दिवस झाले नव्हते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि कदाचित असं म्हटलं. यानंतर त्यांनी हा किंवा नाही असं उत्तर दे, आणि तेदेखील आताच हवं असं सांगितलं".



"त्यावेळी रस्त्यात लोक ओरडत होते. गाड्यांचे हॉर्न वाजत होते आणि आमची गाडी तिथेच थांबलेली होती. यावेळी त्यांनी मला आताच हो किंवा नाही असं उत्तर दे म्हटलं," असा खुलासा नीता अंबानी यांनी केला. दरम्यान यानंतर नीता अंबानी यांनी मुकेश अंबानी यांचा लग्नाचा प्रस्ताव स्विकारला. 


या मुलाखतीत मुकेश अंबानींनी सांगितलं की, यानंतर नीता अंबानी यांनी त्यांनी विचारलं की, जर मी तुम्हाला नाही म्हटलं असतं तर तुम्ही मला कारमधून उतरण्यास सांगितलं असतं का? त्यावर मी सांगितलं की "नाही मी असं अजिबात केलं नसतं. मी तुम्हाला घऱी सोडलं असतं आणि आपण कायमचे चांगले मित्र राहिलो असतो".