कंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेत
Hrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.
Hrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे. यानंतर बॉलिवूडमधून या घटनेवर प्रतिक्रिया उमटत असून काहींनी याचा विरोध केला आहे, तर काहींनी मात्र सीआयएसफ जवानाची बाजू घेतली आहे. कंगनाचं समर्थन करणाऱ्यांमध्ये आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, झोया अख्तर, सोनी राजदान, अर्जून कपूर, प्राजक्ता कोळी यांच्यासह ह्रतिक रोशनचाही समावेश आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत कंगना चेक इन काऊंटवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत आहे. पण व्हिडीओत कानाखाली लगावतानाचा क्षण कैद झालेला नाही.
घटना समोर येताच अनुपम खेर, मिका सिंग, रवीना टंडन, शेखर सुमन यांनी आक्षेप नोंदवला होता. पत्रकार Faye D'Souza यांनी इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत 'हिंसाचार हे कधीच उत्तर असू शकत नाही' असं सांगत घटनेचा विरोध केला आहे. "खासकरून गांधीजींच्या अहिंसेच्या आदर्शातून जन्माला आलेल्या आपल्या देशात नाही. आपण कोणाच्या तरी मतांशी आणि विधानांशी कितीही असहमत असलो तरी काही फरक पडत नाही, आपण हिंसेने व्यक्त होऊ शकत नाही आणि आपण त्याला माफ करू नये," असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "युनिफॉर्ममध्ये असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हिंसक प्रतिक्रिया देणं हे विशेषतः धोकादायक आहे.कल्पना करा, गेल्या दहा वर्षांत, आपल्यापैकी ज्यांनी सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांच्यावर असहमत असलेल्या कर्मचाऱ्यांनी विमानतळावर हल्ला केला असता तर काय झालं असतं". या पोस्टला हृतिक रोशन, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, झोया अख्तर आणि सोनी राजदान यांच्यासह अनेकांनी लाईक केलं आहे.
कंगनाने सीआयएसएफ जवानाला समर्थन देणाऱ्यांना सुनावलं
शनिवारी कंगनाने सीआयएसएफ जवानांना पाठिंबा देणाऱ्यांना उद्देशून एक मोठी नोट शेअर केली. "प्रत्येक बलात्कारी, खुनी, किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमीच एक मजबूत भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक कारण असते, कोणताही गुन्हा विनाकारण घडत नाही, तरीही त्यांना दोषी ठरवून तुरुंगात टाकले जाते. जर तुम्ही गुन्हेगाराच्या भावनिक कारणाशी सहमती दर्शवत असाल तर देशाच्या सर्व कायद्यांचे उल्लंघन करत आहात," असं तिने लिहिलं होतं.