मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जतमधील स्टुडिओला भीषण आग लागली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे असलेल्या नेपथ्य दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओतील एका सेटला आग लागली आहे. हा सेट जोधा अकबर सिनेमाच्या सेटजवळ आहे. फायबर मूर्तींचे गोदाम आणि फायबर सेट यांना आग लागली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान आग लागली. लांबून आगीचे उंचच उंच लोळ दिसत आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत जीवितहानी झालेली नाही पण वित्तहानी झाली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही.



रायगडमधील कर्जत येथे असणाऱ्या एन. डी. स्टुडिओच्या भव्यदिव्य आवारात ही ‘फिल्मी दुनिया’ हे चित्रपट थिमवर आधारीत पार्कही येथे आहे. या ठिकाणी या फिल्मी दुनियेत अनेक सुप्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमाचे सेट आहेत. मात्र सध्या लागलेली आग ही नवीन मालिकेच्या चित्रिकरणासाठी उभारण्यात आलेल्या सेटला लागल्याची माहिती मिळत आहे. सध्या ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार या स्टुडिओच्या मागील बाजूला असणाऱ्या जंगल परिसरामध्ये वणवा पेटला होता. नंतर ही आग स्टुडिओ परिसरामध्ये पसरली आणि तिने भीषण रुप धारण केलं. जोधा अकबर या चित्रपटासाठी उभारण्यात आलेला किल्ल्याचा सेट काही प्रमाणात या आगीत जळाला आहे. एकूण नुकसान किती झालं यासंदर्भात दुपारी तीन वाजेपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.