मुंबई : 'गँग्स ऑफ वासेपूर'फेम अभिनेत्री हुमा कुरैशी हिनेदेखील आपलं मत व्यक्त केलंय. हुमा कुरैशी हिचं कुटुंब काश्मीर खोऱ्यात स्थायिक आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिचा आपल्या कुटुंबीयांसोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिनं आपली चिंता सोशल मीडियावर व्यक्त केली. 'काश्मीरमध्ये नेमकं काय सुरू आहे, याबद्दल कुणाला माहीत आहे का? तिथं राहणाऱ्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही... सगळे जण सुरक्षित असतील, अशी आशा करते' असं ट्विट हुमानं ट्विटरवर केलं होतं. तर त्यावर तिला अनेकांनी ट्रोल केलं. यानंतर हुमानं ज्यांना काश्मीरमधल्या परिस्थितीचा, रक्तरंजित इतिहासाचा आणि काश्मीरींनी काय गमावलंय (मुस्लीम आणि पंडीत) याचा गंध नाही त्यांनी यावर चर्चा करू नये, असा सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या कुटुंबीयांच्या काळजीत असलेल्या हुमाला काहींनी सोशल मीडियावरून काळजी न करण्याचा सल्ला दिला तर काहींनी म्हटलं 'काश्मीरच्या लोकांसाठी तू चिंता करण्याचं कारण नाही, चिंता करण्यासाठी तिथं अनेक लोक आहेत... तिथं काहीही गडबड नाही...' तर काहींनी हुमाला आश्वासित करत 'काळजी करू नकोस, लवकरच सगळं काही सुरूळीत होईल' असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 




जम्मू-काश्मीरशी संबंधित अनुच्छेद ३७० आणि ३५ ए संसदेच्या दोन्ही सभागृहात विधेयक मांडून रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. 'ही परिस्थिती लोकांनी 'संवेदनशील'पणे हाताळावी', असंही हुमानं म्हटलंय.


आपल्या ट्विटमध्ये तिनं म्हटलंय, 'सध्या जे सर्व लोक काश्मीरवर आपलं मत व्यक्त करत आहेत, त्यांना तिथल्या आयुष्याचा, रक्तरंजित इतिहासाचा आणि काश्मीरींनी काय गमावलंय (मुस्लीम आणि पंडीत) याचा जराही अंदाजा नाही. मी विनंती करते बेजबाबदार वक्तव्य करू नका. तिथं महिला, लहान मुलं, ज्येष्ठ आणि आजारी लोक आहेत. काही क्षण स्वत:ला त्यांच्याजागी ठेऊन पाहा आणि संवेदनशील बना'.




यासोबतच अभिनेता संजय सूरी यानंही केलेल्या ट्विटमध्ये ' सर्वांना एक विनंती आहे. अनेकांनी आपला जीव गमावला तर अनेक जण भोगत आहेत. माझी सगळ्यांनाच प्रार्थना आहे त्यांच्याप्रती प्रेम, दया, काळजी, मान सन्मान दाखवा. यावेळी बेजबाबदार वक्तव्य त्यांची मदत करू शकणार नाहीत #JammuKashmir' असं म्हणत लोकांना वादग्रस्त टिप्पणी न करण्याची विनंती केलीय.




जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्यानं आता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालंय. यानुसार, जम्मू काश्मीरचा दोन भागांत विभाजन करण्यात आलंय. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलंय. यामधील एक केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरला विधानसभा असेल तर दुसभा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये मात्र विधानसभा राहणार नाही.