लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला इतका मोठा फटका
लॉकडाऊन संपल्यानंतरही बॉलीवूडसमोर चिंता
सोनल सिंह, मुंबई : कोरोनाचं संकट येताच सर्वप्रथम बंद झाले ते मॉल आणि चित्रपटगृह. त्यामुळे रोज शेकडो कोटींची उलाढाल करणारी फिल्म इंडस्ट्री एकदम ठप्प झाली. लॉकडाऊनचा बॉलिवूडला मोठा बसला आणि लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने हे नुकसान आणखी वाढले आहे.
१९ मार्चपासून बॉलीवूड इंडस्ट्री पूर्ण ठप्प आहे. चित्रपटच नव्हे तर छोटया पडद्यासाठी आणि वेबसाठी बनवल्या जाणाऱ्या मालिकांचं शूटिंगही पूर्ण बंद आहे. त्यातच लॉकडाऊन कालावधीत वाढ झाल्याने फिल्म इंडस्ट्रीच्या नुकसानीचा आकडा हजार कोटींपेक्षा अधिक झाला आहे.
बॉलीवूड इंडस्ट्रीला कुठे आणि किती फटका?
ट्रेड अँनालिस्ट कोमल नाहटा यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा ३१ मार्चपर्यंत फिल्म इंडस्ट्री बंद ठेवण्याची चर्चा झाली होती. त्यावेळी या कालावधीत ७५० ते ८०० कोटी रुपयांचं नुकसान होईल असा अंदाज होता. पण आता लॉकडाऊनचा कालावधी एक महिन्यापेक्षा अधिक वाढवल्याने फिल्म इंडस्ट्रीचं नुकसान सुमारे १५०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वाढवलं तर नुकसानीचा हा आकडा आणखी वाढेल.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला प्रामुख्याने दोन-तीन प्रकारचे नुकसान आहे. पहिले म्हणजे शूटिंग पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे संबंधित सर्वच घटकांचं मोठं नुकसान होत आहे. दुसरे म्हणजे जे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत, पण त्यांचं प्रदर्शन होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत निर्मात्यांनी गुंतवलेल्या पैशांचा परतावा होणार नाही आणि कर्जावरील व्याज मात्र वाढत जाईल. याशिवाय जे चित्रपट अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यांनी गुंतवलेल्या पैशाचा परतावा लवकर मिळणार नाही आणि घेतलेल्या कर्जावर व्याजही वाढत जाईल.
लॉकडाऊन संपल्यानंतरही मोठी चिंता
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बॉक्स ऑफिस पूर्णपणे बंद असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. जेव्हा लॉकडाऊन संपेल त्यानंतर चित्रपटगृह सुरु करायला आणखी वेळ लागेल. चित्रपटगृह सुरु झाल्यानंतरही प्रेक्षक लगेचच चित्रपटगृहात येण्याची शक्यता कमी आहे. कारण कोरोनाची भीती त्यांच्या मनात कायम असेल. याशिवाय अनेकांचे उत्पन्नाचे साधन बंद आहे. काहीजणांच्या नोकऱ्याही जाऊ शकतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपटगृहात येतील की नाही याबाबत साशंकता आहे.
एकूणच कोरोनामुळे जे वातावरण तयार झाले आहे ते पाहता फिल्म इंडस्ट्री मूळ पदावर यायला आणखी बरेच महिने लागतील.
लॉकडाऊनमुळे बॉलीवूडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बॉलीवूडशी संबंधित सर्वच लोक घरी बसले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदतीसाठी काही कलाकार प्रयत्न करत आहेत. या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठीही खूप वेळ लागेल अशी चिन्हं आहेत.