Srushti Tawde Assauled by Maid: 'मै नही तो कौन बे', 'छोटा डॉन' अशा अनेक रॅपमुळे सृष्टी तावडे (Srushti Tawde) हे नवा घराघऱात पोहोचलं आहे. Hustle फेम सृष्टी तावडेला आपल्या वेगळ्या स्टाइलमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मराठमोळी मुलगी असल्याने महाराष्ट्राला तिचं कौतुक आहे. दरम्यान, सृष्टी तावडेने नुकतंच आपल्या आयुष्यासंबंधी एक धक्कादायक खुलासा केला आहे. लहान असताना सृष्टी तावडेवर घरातील मोलकरणीने अत्याचार केले होते. सृष्टी तावडेने नेमकं काय सांगितलं आहे जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सृष्टी तावडे नुकतीच 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. "माझे लहानपणी मित्र नव्हते. ज्यांना मी माझे मित्र समजत होते, त्यातील एकाने स्लॅम बूकमध्ये सृष्टी बोलते तेव्हा मला आवडत नाही असं लिहिलं होतं. हे फारच स्वार्थी आणि दुखावणारं होतं. ती गोष्ट, तो क्षण आजही माझ्या तशीच लक्षात आहे, कारण मला जबरदस्ती ते वाचण्यास सांगण्यात आलं होतं". 


पुढे तिने सांगितलं की "त्या गोष्टीचा माझं बालपण आणि कोवळ्या मनावर फार परिणाम झाला. त्या गोष्टीमुळे मी आत्मविश्वास गमावला होता. मी बोलावं की नाही, कोणाला आवडेल की नाही असा विचार करायची. यामध्येच माझं बालपण आणि तरुणपण निघून गेलं. पण मी 20 वर्षांची असताना लिहिण्यास सुरुवात केली आणि माझा सगळा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर माझ्यात आत्मविश्वास बदलला. तसंच ज्याने कोणी ते लिहिलं होतं, त्याचं नाव आज कोणाला माहिती नाही. ते नाव तेव्हाच कळेल जेव्हा मी बोलेन".


मोलकरणीकडून तीन वर्ष अत्याचार


सृष्टीने एका रॅपमध्ये लहानपणी झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं होतं. याबद्दल तिला विचारलं असता तिने सांगितलं की "माझ्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना असून, त्यामध्ये लहानपणीची एक घटना आहे. माझ्या मोलकरणीने माझ्यावर तीन वर्षं अत्याचार केले होते. जवळपास रोज माझ्यावर अत्याचार होत होते".


"माझे आई-वडील नोकरी करत होते. आमच्या घरात नेहमीच एक मोलकरीण असायची. मी 4 वर्षांची असताना एक नवी मोलकरीण आली होती. तिचं आमच्याच नात्यातील एकाशी अफेअर होतं. मी यासंबंधी आई-वडील तसंच कोणाला सांगू नये यासाठी भीती राहावी म्हणून मला ते नेहमी मारत होते. नंतर कदाचित त्यांना यातून आनंद मिळू लागला आणि तीन वर्ष ते रोज मारहाण करु लागले. ते रोज नव्या पद्दती शोधत होते. त्यांच्याकडे बाळाला कसं मारुन टाकावं असं पुस्तकच असावं. घरातील सर्व वस्तूंनी त्यांनी मला मारलं".


"आता मी त्यातून बाहेर पडली असल्याने मी त्यावर बिनधास्तपणे बोलू शकते. पण त्या घटनेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला होता. पण त्यातून जे घेतलं पाहिजे ते मी घेतलं आणि बाकी सोडून दिलं," असं सृष्टीने सांगितलं.