`पद्मावती` वादावर रणवीर बोलला!
पद्मावती चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावर रणवीर सिंगनं मौन सोडलं आहे.
मुंबई : पद्मावती चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावर रणवीर सिंगनं मौन सोडलं आहे. या चित्रपटामध्ये रणवीर अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. मी चित्रपटाचा दिग्दर्शक संजय लीला भन्सालींसोबत २०० टक्के आहे, असं रणवीर म्हणाला आहे.
पद्मावतीचा मुद्दा हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या वादाबाबत काहाही न बोलण्याचं मला सांगण्यात आल्याचंही रणवीर म्हणाला आहे. चित्रपटाच्या वादाबाबत निर्माते जी भूमिका घेतील तीच अधिकृत असेल, असं सांगत रणवीरनं सावध प्रतिक्रिया दिली आहे.
ज्यांना चित्रपटाबद्दल आक्षेप आहेत त्यांनी रिलीज झाल्यावर चित्रपट पाहावा. भन्सालींवर कोणीही संशय घेऊ नये. भन्साली उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि ते भारतीय संस्कृतीचा मान ठेवतात, अशा शब्दांमध्ये रणवीरनं संजय लीला भन्सालींचं समर्थन केलं आहे.
भन्साली कधीच कोणाला दुखावू शकत नाहीत. देशाला गर्व होईल, असा चित्रपट भन्सालींना बनवायचा आहे. पण सध्या सुरु असलेल्या वादामुळे ते दुखावले गेले आहेत, असं रणवीर सिंगनं सांगितलं आहे.