मुंबई : बॉलिवूड 'पॉवरहाऊस' रणवीर कपूर त्याच्या प्रत्येक सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो. त्याने विविध चित्रपटातून साकारलेल्या सर्वच भूमिकांना त्याने योग्य तो न्याय दिला आहे. प्रेक्षकांकडूनही त्याच्या अभिनयाला दाद मिळत आहे. 'पद्मावत'मधला अल्लाउद्दिन खिलजी किंवा 'सिंबा'मधला पोलिस किंवा 'गली बॉय'मधला रॅपर अशा सगळ्याच वेगळ्या भूमिका रणवीरने चोख बजावल्या आहेत. 'गली बॉय'च्या दणदणीत यशानंतर रणवीर पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीरचं त्याच्या आगामी '83' चित्रपटाचं प्रशिक्षणही सुरू करण्यात आलं आहे. भारताच्या क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83' हा चित्रपट असून चित्रपटात रणवीर कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या चित्रपटात मी कपिल देव यांची सावली दिसण्याचा प्रयत्न करणार आहे. या व्यक्तीरेखेसाठी मी संपूर्ण प्रयत्न करणार असून आशा करतो की प्रेक्षकांना माझी ही भूमिका आवडेल' मी त्यांच्या व्यक्तीमत्त्वानुसार अभिनेता म्हणून स्वत:मध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून बॉलिंग, बॅटिंगचं प्रशिक्षणही घेत आहे. अधिक वेळ त्यांच्यासोबत राहून ते करत असलेल्या अधिकाधिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. पडद्यावर एखाद्याची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अशाप्रकारे त्यांच्यासोबत वेळ घालवणं ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. असं त्याने म्हटलंय. कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारण्यसाठी रणवीर कपिल देव यांच्याकडून विशेष प्रशिक्षण घेत आहे.  



१९८३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी बजावत विश्वचषक भारताच्या नावे केला. त्यावेळी कर्णधार असलेले कपिल देव यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडण्याचा प्रयत्न '83' या बायोपिकमधून करण्यात येणार आहे. भारताच्या क्रिकेट इतिहासातील तो ऐतिहासिक विजयही या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. '83' हिंदीसह  तमीळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आह. कबीर खान दिग्दर्शित '83' १० एप्रिल २०२० मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.