`द एक्सिडेंटल प्रायमिनिस्टर या सिनेमात ही अभिनेत्री साकारणार सोनिया गांधींची भूमिका...
लेखक संजय बरुआ यांच्या द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर सिनेमा बनणार.
मुंबई : लेखक संजय बरुआ यांच्या द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकावर सिनेमा बनणार असून या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. या सिनेमात अभिनेता अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत झळकणार आहे. हा लूक इतका जबरदस्त झाला आहे की, मनमोहन सिंगांच्या वेशातील अनुपम खेर यांना ओळखणे तसे कठीण आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर करत असून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे.
या कलाकारांच्या प्रमुख भूमिका
अनुपम खेर व्यतिरिक्त राजनेतिक विश्लेषक संजय बरुआ यांची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना साकारणार आहे. लिपस्टिक अंडर माय बुर्का सिनेमात झळकलेली अभिनेत्री अहाना कुमरा या सिनेमात प्रियंका गांधींच्या भूमिकेत दिसेल.
ही अभिनेत्री सोनिया गांधींच्या भूमिकेत
तर या सिनेमातील प्रमुख भूमिकेचा खुलासा झाला आहे. जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नर्ट या सिनेमात युपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीच्या भुमिकेत झळकेल. सुजैन बर्नर्टने अभिनेता अखिल मिश्रासोबत विवाह केला. ३५ वर्षीय सुजैन उत्तम हिंदी बोलते. हिंदीच नाही तर तिला बंगाली आणि मराठी भाषाही अवगत आहे.
भारतीय टी.व्ही. मालिका आणि सिनेमात काम
यापूर्वी सुजैनने प्रसिद्ध टी.व्ही. मालिका चक्रवर्ती सम्राट अशोकमध्ये रानी हेलनाच्या भूमिकेत दिसली होती. तसंच टी.व्ही. सिरीज प्रधानमंत्रीमध्येही सोनिया गांधींच्या भूमिकेत झळकली होती. याव्यतिरिक्त सुजैनाने एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की मध्येही काम केले होते. जर्मन असूनही भारतीय टी.व्ही. मालिका आणि सिनेमात तिला अनेकदा पाहिले आहे.