नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय चित्रपट, टीव्ही शो आणि इतर भारतीय कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाकडून केबल ऑपरेटरला इशारा देण्यात आला आहे. टीव्हीवर दाखवण्यात येणारा कोणताही भारतीय कटेंट, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक्सप्रेस न्यूज'च्या रिपोर्टनुसार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सलीम बेग यांनी, गुजरांवाला येथील प्राधिकरण कार्यालयात केबल ऑपरेटरची भेट घेतली. यावेळी त्यांनी केबलवर भारतीय चॅनेल, कोणताही भारतीय कटेंट दाखवण्यासाठी बंदी घातली. भारतीय टीव्ही चॅनेलवर बहिष्कार टाकण्यात आल्याचंही तेथील केबल ऑपरेटर्सना सांगण्यात आलं आहे.


जर कोणत्याही केबल ऑपरेटरकडून भारतीय चॅनेल किंवा इतर कोणताही भारतीय कटेंट प्रसारित केला गेल्यास, त्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. भारतीय चॅनेल, जाहिराती दाखवणाऱ्या ऑपरेटरचा परवाना रद्द करण्यात येईल. शिवाय त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.