मुंबई : जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापारी करार संपवण्याचा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेली समझौता एक्स्प्रेस रोखण्याचा निर्णय घेतला. आता इम्रान खान सरकारकडून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान पंतप्रधानांचे विशेष सल्लागार फिरदौस आशिक अवान यांनी, कोणत्याही भारतीय चित्रपटाचं स्क्रिनिंग पाकिस्तानमध्ये होणार नसल्याचं सांगितलं. 


एका पॉलिसी अंतर्गत, पाकिस्तानकडून भारतीय परंपरा दाखवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कंटेंटवर बंदी घालण्यात आली. त्यांनी हा निर्णय पाकिस्तानच्या काश्मीरींच्या समर्थनार्थ घेण्यात आला असल्याचं सांगितलं.


दरम्यान, यावर्षी जम्मू-काश्मीरमधील घटनेनंतर भारतीय चित्रपट निर्मात्यांनी स्वतःहूनच निर्णय घेतला होता की, ते पाकिस्तानात चित्रपटांचं स्क्रिनिंग करणार नाहीत. अनेक निर्मात्यांनी पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित न करण्याची घोषणाही केली होती. 


एवढंच नाही तर, बालाकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी आपल्या चित्रपटात पाकिस्तान कलाकारांना न घेण्याचीही घोषणा केली होती. 


जम्मू-काश्मीरवर भारताच्या निर्णयानंतर अतिफ असलम, माहिरा खान यांसारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतावर टीका केली आहे. 


पाकिस्तानने १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्रदिनी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानने तिथल्या भारतीय राजदूतांना मायदेशी जाण्याचे आवाहनही केले आहे.