`The Kashmir Files` न्यूझीलंडमध्ये बॅनची मागणी, पण तेथील राजकीय व्यक्तीचा थेट सपोर्ट
तो सिनेमा म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित `द कश्मीर फाइल्स`...
मुंबई : बॉलिवूडमधील एका सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळते. तो सिनेमा म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स'...
या सिनेमाच्या टीमसाठी हा फक्त एक सिनेमा नव्हता, तर त्यांना कश्मीरी पंडितांसोबत घडलेला प्रकार या सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. त्यासाठी या सिनेमाची टीम सुरुवातीपासूनच विशेष मेहनत घेताना दिसत आहे.
पण, सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच त्याला काही गट विरोध केला. त्यामुळे हा सिनेमा रिलीज झाला असला तरी अद्याप अनेक वादांनी घेरला गेला आहे.
हा सिनेमा 11 मार्च 2022 रोजी देश-विदेशात रिलीज झाला असला तरी पुन्हा एकदा या सिनेमाला मोठ्या वादाचा सामना करावा लागत आहे.
न्यूझीलंड ( New Zealand) मध्येही सध्या या सिनेमाची सर्वात जास्त चर्चा आहे. कारण न्यूझीलंडमध्ये या सिनेमाचं प्रदर्शन सध्या तरी थांबवण्यात आलं आहे. तेथील काही गटांकडून हा सिनेमा सेंन्सॉर बोर्डाने बॅन करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे न्यूझीलंडमधील इतर लोकांनी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. ज्यामुळे कश्मीरी पंडीतांसोबत काय घडलं हे लोकांपर्यंत पोहोचेल.
'द कश्मीर फाइल्स'ला एक प्रमाणपत्र मिळालं होतं. ज्यात 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना हा सिनेमा पाहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता न्यूझीलंडमधील सेन्सॉर बोर्डाला या प्रमाणपत्राचा फेर आढावा घ्यायचा आहे,अशी चर्चा आहे.
तर दुसरीकडे न्यूझीलंडमधील माजी खासदार आणि राजकीय नेते महेश बिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर करत या सिनेमाला पाठींबा दर्शविला आहे. तसेच सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा लोकांना पाहण्यासाठी खुला करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
महेश बिंद्रा हे मूळचे भारतीय आहेत. ते न्यूझीलंडमध्ये वास्तव्याला असून तेथील राजकारणात सक्रीय आहेत. त्यांची ही पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
न्यूझीलंडमधील ही परिस्थिती पाहता या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी भारतीय जनतेला या सिनेमाच्या रिलीजसाठी न्यूझीलंड सरकारची परवानगी मिळावी यासाठी जमेल ते प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे.