डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार भारतातील पहिला मराठी चित्रपट
चित्रपटगृहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने निर्मात्यांकडे ओटीटी हा पर्याय आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकाडऊन आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मालिका, चित्रपटांचं चित्रीकरणही बंद आहे. चित्रिकरण पूर्ण झालेलं असतानाही अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले नाही. मात्र, सध्या चित्रपटगृहात चित्रपट प्रदशित होत नसल्याने निर्मात्यांकडे ओटीटी अर्थात ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर हा पर्याय आहे. बॉलिवूडमध्ये चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहेत.
पण आता मराठी चित्रपट निर्मातेही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थेट ओटीटीकडे वळले आहेत. अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांची प्रमुख भूमिका असलेला 'परिणती' हा चित्रपट ओटीटी अर्थात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 'परिणती' हा ओटीटीवर प्रदर्शित होणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.
चित्रपट निर्माते आणि बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर पराग मेहता यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, बॉलिवूडच्या चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अशा परिस्थितीत आपल्याला काही प्रमाणात टिकून राहण्यासाठी, चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावं लागणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी हा एक पर्याय होता. त्यामुळे ओटीटीवर 'परिणती' चित्रपट प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला. याला अनेकांचा सकारात्मक प्रतिसादही मिळाला असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली जाणार असल्याचं, पराग यांनी सांगितलं.