मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी सध्या लग्नसराईचे वारे वाहत असून, सर्वत्र धामधुमीचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या आणि अभिनेता व्यावसायिक विशनगन वनानगामुडी यांच्या विवाहसोहळ्यापूर्वीच्या कार्य़क्रमांना दणक्यात सुरुवात झाली असून सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटोही व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारपासूनच हे फोटो अनेकांचं लक्ष वेधत होते. ज्यामध्ये पाहुण्या मंडळींच्या साथीने खुद्द अभिनेते रजनीकांतही या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत होते. सौंदर्या आणि विशागन यांच्या नात्याविषयी गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत्या. ज्यानंतर आता त्यांच्या बहुचर्चित विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 




११ फेब्रुवारीला सौंदर्या आणि विशागन विवाहबंधनात अडकणार असून, चेन्नईत हा विवाहसोहळा पार पडेल. या विवाहसोहळ्यापूर्वी संगीत आणि मेहंदी समारंभ पार पडणार आहे. त्याशिवाय लग्नाआधी रजनीकांत यांच्या घरी एक पूजाही होणार आहे. विवाह सोहळ्यानंतर शानदार रिसेप्शन पार्ट्यांचंही आयोजन करण्यात येणार आहे. पहिली पार्टी रजनीकांत यांची पत्नी लता रजनीकांत देणार आहेत. तर आणखी एक पार्टी ही रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या हिच्याकडून देण्यात येणार आहे. 






सौंदर्याच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर, हे तिचं दुसरं लग्नं आहे. याआधी अश्विन रामकुमार याच्याशी ती विवाहबंधात अडकली होती. तिला एक मुलगाही आहे. पण, अश्विनसोबतचं तिचं नातं फार काळ टीकू शकलं नाही. परस्पर संबंधांमध्ये मतभेद असल्याच्या कारणावरुन त्या दोघांनीही या नात्यातून वेगळं होत घटस्फोट घेतला होता.