IVF नंतरही अभिनेत्रीला मातृत्त्वं नाहीच; तिच्या वेदना पाहून पतीही भावूक
....तरीही तिला गर्भधारणेत अडचणी येत आहेत
मुंबई : एखाद्या महिलेला जेव्हा मातृत्त्वाची चाहूल लागते त्या क्षणापासून शरीरात होणारे बदल आणि त्यानंतर बाळाचा जन्म हे सर्व अनुभव तिला नव्यानं घडवत असतात. हा प्रवास सोपा नसतो. बदलत्या जीवनशैलीमुळं बऱ्याच महिलांना गर्भधारणेमध्ये अडचणी येतात आणि त्यांना दुर्दैवानं मातृत्त्वापासून वंचित रहावं लागतं.
अनेक प्रयत्नांनंतरही अभिनेत्री संभावना सेठलासुद्धा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लेखक आणि अभिनेता अविनाश द्विवेदीची पत्नी, संभावना गेल्या बऱ्याच काळापासून आई होण्यासाठी आयव्हीएफ मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. पण, तरीही तिला गर्भधारणेत अडचणी येत आहेत. (IVF Actress sambhavna seth unsuccessful attempt)
अविनाशनं एका मुलाखतीत त्याची पत्नी नेमकी कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहे, याची माहिती देत तिच्या वेदनांना वाचा फोडली. 2016 मध्ये लग्न झालं त्यावेळी आम्ही मुलाचा फार विचार केला नव्हता कारण आम्ही स्वत: त्यावेळी तयार नव्हतो. त्यावेळी आमच्यावर कुटुंबाचाही दबाव होता. पण, हा निर्णय आम्हा दोघांचा असेल हे आम्ही ठरवलं होतं असं अविनाशनं सांगितलं.
बाळासाठी ही दोघंही तयार असताना संभावनाला गर्भधारणेत अडचणी येऊ लागल्या. यासाठी त्यांनी IVF चाही अवलंब केला. अतिशय वेदनादायी अशा या प्रक्रियेच्या वेदना तेव्हा अधिक जाणवल्या जेव्हा या जोडीनं अपयशाचा सामना केला.
'मी संभावनाला जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तिचं मन तिळतिळ तुटताना मला दिसत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत शारीरिक आणि मानसिक आधाराती गरज असते', असंही तो म्हणाला. खुद्द संभावना या प्रक्रियेबद्दल सजग असून, तिच्या शरीरात यामुळं असंख्य बदल होत आहेत, ज्यामुळं तिचं रोजचं जगणंही आव्हानात्मक झालं आहे. दर महिन्याला आयव्हीएफ आणि त्यानंतरचं अपयश हे सारं झेलूनही संभावना खंबीरपणे उभी आहे, हे म्हणताना त्यांची हतबलता स्पष्ट दिसून आली.