`या` सेलिब्रिटी जोडप्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन
कलाविश्वातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव...
मुंबई : हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी जय भानुशाली आणि माही विज लग्नाच्या ८ वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत. माहीने एका मुलीला जन्म दिला आहे. माहीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे.
माहीने ही गुड न्यूज शेअर केल्यानंतर या दोघांवरही कलाविश्वातून, त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जय आणि माही २०११ मध्ये विवाहबंधनात अडकले. जय आणि माही आधीच दोन मुलांचे आई-वडिल आहेत. या दोघांनी २०१७ मध्ये त्यांच्या घरी काम करणाऱ्या मदतनीस महिलेच्या २ मुलांना दत्तक घेतलं आहे. खुशी (५) आणि राजवीर (३) अशी या दोघांची नावं आहेत. ही दोनही मुलं त्यांच्या आई-वडिलांसोबतच राहतात. पण त्यांचा शिक्षणाचा आणि इतर खर्च जय-माही यांनी उचलला आहे.
माही 'लागी तुझसे लगन' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर जय 'सबसे बडा कलाकार'मधून समोर आला. याशिवाय जय-माही ही जोडी रिअॅलिटी शो 'नच बलिये'मधूनही प्रसिद्धीझोतात आली होती. सध्या जय भानुशाली सुपर स्टार सिंगर या शोसाठी सुत्रसंचालन करत आहे.